१ मे, महाराष्ट्र दिन, नाटकी तारे संस्थेच्या वतीने ठाण्यात मराठी रॅप स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा मला भाग होता आले. नाटकीतारे ची संपूर्ण टीम, सिद्धेश आयरे आणि आदित्य संभूस यांच्या माध्यमातून या स्पर्धेची रूपरेषा ठरवण्यात आली. गेले आठवडाभर त्यावर काम सूरू होते. शेवटी तो दिवस आला.
महाराष्ट्र राज्य विविध लोककलांनी परिपूर्ण आहे. त्यात पोवाडे, लावणी, अभंग हा सांस्कृतिक ठेवा आहे. अशा वेळी इतर भाषांमध्ये जास्त प्रमाणात ऐकलेला हा एक कलेचा प्रकार “ रॅप” मराठीत येऊन काय करू शकतो या उत्सुकतेने या संपूर्ण टीम चा मी भाग झाले.
कार्यक्रम तसाच स्मरणीय झाला. कुठे ही मराठी संस्कृतीला गाल बोट लागणार नाही याची काळजी घेतली गेली. उलट मराठीचा झेंडा अमराठी समाजात ही उंच जाईल असे रॅपचे सादरीकरण झाले. त्यामध्ये ही महाराष्ट्राचे दैवत, छत्रपती शिवरायांची महती सांगणारे रॅप त्यानिमित्ताने ऐकायला मिळाले. आजच्या तरुणांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या, समाजात बदलत चाललेले विचार प्रवाह या विषयांवर रॅप सादर झाले. थोडी घडी बदलून तोच विषय रॅप च्या माध्यमातून बिट्स वर ही सादर करता येईल हे समजले.
समाज प्रबोधन, सामाजिक समस्या, प्रेम, नाते संबंध, विरह या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतात. कधी कधी वेगवेगळी पुस्तके एकच गोष्टीचे मर्म सांगणारी असतात. प्रत्येकाची निवड वेगळी असते. असे काहीसे मत ही स्पर्धा समारोपाकडे येताना माझे झाले. रॅप ही संकल्पना आजच्या एका समूहाला आपले विषय मांडण्याचे माध्यम देते. ते सुद्धा कलात्मक आहे. हे आलेल्या स्पर्धेकांनी सिद्ध केले.
आलेल्या पाहुणे कलाकारांनी ही या गोष्टीचे कौतुक केले. आजच्या पिढीला व्यक्त होण्यासाठी असंख्य माध्यमे आहेत. असंख्य पद्धतीने ते पुढे येऊ शकतात. पण फक्त संघटित होण्याची गरज आहे आणि त्याचे काम या निमित्ताने आदित्य दादा आणि सिद्धेश करत आहेत, हे खरंच कौतुकास्पद आहे.
ऋषी ओबेरॉय आणि विनायक गाडे यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. चार्वाक आणि प्रज्वल यांच्या दिलखुलास सूत्र संचालनातून स्पर्धा आणखी खुलून आली. सगळ्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. नाटकीतारे सोबत जोडली गेलेली टीम ज्यात मुद्रा, ध्रुव, साहिल, तेजश्री, हर्षदा, कुंदन, पार्थ, सानिका, श्रुती, पूजा, प्रज्ञा, प्रणय, शिवम, चार्वाक, प्रज्वल हे सगळे या बदलाचे साक्षीदार ठरले. प्रत्येकाला तुळशी रोप देऊन सन्मानित करण्यात आले. मला मिळालेली तुळस आणि नाटकी तारे लिहिलेला मग सोबत घेऊन मी परतले.
No comments:
Post a Comment