Thursday, 6 July 2023

वारी

ही कुठली वारी मी करते ? रस्ता नवा. वळणे नवी. माणसे नवी. थोडी अनोळखी, थोडी ओळखीची. जिथून सुरुवात केलेली, ते ठिकाण ही आता दूर राहिले. इथे रस्त्यात कुठे कुठे खूप गर्दी आहे. कुठे कोणी एकटाच आपल्या शोधात आहे. कुठे आनंद सोहळे आहेत. नव्या वळणावर नवे प्रयोग आहेत. नवे अनुभव आहेत. जुन्या रूढी परंपरा आहेत. त्यांचा हात धरून चाललेली, हातात टाळ घेतलेली आजची तांत्रिक पिढी आहे. इथे मिळवल्याचे कौतुक नाही. गमवल्याचे दुःख नाही. पण चालण्याचे बळ आहे.

ही कुठली वारी आहे, जिथे “ मी “ चा प्रवास “ आम्ही “ होतो ? जिथे वाट एक असते तरी प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. या प्रवासात कोण असते, आपल्याला थांबल्यावर पुढे नेते? कोण असते जे आपली शक्ती होते ! जे चालता चालता थांबायला लावते. अर्धी भाकरी आपल्या पानात घालते. आपल्याही नकळत आपले मळलेले पाय धरते. माणसातल्या देवाला शोधते. नमस्कार करणारा एक वारकरी तेव्हा कुणाकुणात देव शोधतो.

ही कुठली वारी आहे याचे उत्तर शोधता शोधता आपण येऊन पोहोचतो, कुठल्या तरी उंच कड्यावर, जिथून खाली खोल दरी असते. तिथून कळते किती अंतर इथवर कापले आणि किती नजीक आलोय. चालता चालता न येणारा अंदाज उंचीवर लगेच कळून येतो. पण ती उंची पुन्हा जमिनीवर येणं ही सांगत असते. दऱ्या खोऱ्यातून वाहणारा हा मानवी प्रवाह सुचवत असतो, आपले निसर्गाशी असलेले नाते. आपले स्वतः शी असलेले नाते. आपले जीवनाशी असलेले नाते. वाटेत एखादा नदीचा घाट लागतो. नदीच्या पात्रात आपले प्रतिबिंब पाहताना तिरावरची आपली सगळी सुख दुःख, सगळी स्वप्नं आठवतात. त्याचे तरंग उठत असतात. तेव्हा संथ वाहणारे पाणी आपल्या पायाला लागते आणि आपल्या सत्कर्माची आठवण करून देते.

ही कुठली वारी आहे ज्याला परतीची वारी नाही. जो तो येतो एकदा भेटतो. एकदाच भेटलेले असे काही आठवणीतले पान होते. पुन्हा भेटण्याची इच्छा. भेटल्याचे समाधान. परतण्यामागे काळजी असते. पुढे जाण्यात श्रद्धा असते. त्यात रंग एक असतो. रूप एक असते . “ माऊली “ नाव एक असते. पुढे जाण्याचे, मागे पाहण्याचे एकच कारण असते. इथवर येता येता जोडलेले काही, मागे सोडलेले काही... आपलेच काही बोलवत असते.

या प्रवासात कळलेले नवे काही, आठवणीतले, मनातले सांगता सांगता वाटेत विठ्ठलच ऐकणारे कान होतो. लिहिणारे माझे पान होतो. वाचणारे मन होतो. ही वारी आता “ माझी “ नाही “ आमची “ वारी होते.

1 comment:

Mahesh janardan ratnparkhi said...

जय हरि पंढरीची वारी😍👌🌻🙏

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...