ती माती असते ना ... ऋतुप्रमाणे बदलणे तिच्यात पुरेपूर भिनलेले असते. म्हणजे पहा ना... माती सुकलेली असो किंवा ओली ती मातीच असते पण नवीन निर्माण करण्याची ताकद फक्त तिच्या ओलाव्यात असते. सुकलेल्या खडकाळ मातीत पावसामुळे ओलावा येणं हा तिच्यात झालेला बदलच ! ती च माती भाजून निघते तेव्हा कोणाचे तरी घर उभे राहते. पाऊस पडल्या नंतर जेव्हा मातीचा दरवळ सगळीकडे पसरतो ना, तेव्हा आपल्याला तिचे असणे सुखावते. आजूबाजूला असणे जाणवते. तिच्यातला बदल तिला तिची वेगळी ओळख देतो. ही माती जर वाळू च राहिली असती तर रेताड जमिनीवर फुल ही आले नसते. तिचा सुगंध मनात भरून राहिला नसता. वेगवेगळे रंग तिच्या अंतरंगातून उठून वर आले नसते. तिच्यातला हा रेती ते माती होण्याचा बदल तिने घडवून आणला. स्वीकारला. लाल असो, काळी असो, माती ही वाट पाहत असते नवनिर्मितीची, नवं रोप येण्याची, नवी फुले फुलण्याची आणि नवे ऋतू पाहण्याची. त्यामुळेच ती बदलते.
जशी ती माती सृष्टी सोबत स्वतः ला बदलत जाते. नवे काही घडवत जाते. काही तरी सुंदर सजवत जाते. काही तरी रुजवत जाते. तसे आपण ही इतक्या सहज बदल स्वीकारले तर... आपलं बदलणे ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. आपल्या जीवनात येणारे वेगवेगळे ऋतू, वेगवेगळे प्रसंग. आपल्यातला बदल आपण किती गांभीर्याने घेतो... निसर्ग बदलत असतो. आजची कळी उद्या फुल झालेली असते. एखादा खळाळत कोसळणारा झरा नदीशी जोडला जातो. तितकाच संथपणा त्यात येतो. बदल शिकवतो हा सृष्टीचा स्थायी स्वभाव आहे. बदल सांगत असतो, बदलणे म्हणजे फक्त थांबणे नव्हे कारण रात्रीच्या अंधारामागे येणारा पुढच्या दिवसाचा सूर्य असतो. बदलणे म्हणजे फक्त पळणे नव्हे झाडालाही फळ येण्यासाठी वाट पहावी लागते. बदलणे म्हणजे हरवणे नव्हे कारण सारे आपल्यातच सापडते. जसे पाणी येते ना मुळांना शोधत तसे शोधावे लागते. बदलणे म्हणजे रुजवणे, फुलवणे आणि सतत स्वतः मध्ये काही तरी झिरपत जाणे. त्यातून नवे काही जन्माला येणे. कडकडीत उन्हातून चालताना ओल्या मातीचा स्पर्श पावलांना होतो, तो आपल्या आठवणीत राहतो, तेव्हा वाटते बदलणे इतके सोपे असते !
No comments:
Post a Comment