Friday, 26 January 2024

गाभारा


आम्ही पनवेल जवळच्या पौराणिक शिव मंदिराला भेट दिली होती. ते फार जुने शिव मंदिर होते. तिथल्या पुजार्यांनी त्या मंदिराला आठशे वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले. मंदिराचे कोरीव बांधकाम पाहिले. तिथला थंड गाभारा पायाच्या तळव्यांना शांत करत होता. मंदिराच्या अगदी पायऱ्यांना लागून असलेला नदीचा घाट आणि संथ वाहणारी नदी एखाद्या निसर्ग चित्रासारखी सुंदर भासत होती. आजूबाजूला वड, पिंपळाच्या मोठाल्या झाडांची गर्दी होती. मंदिराप्रमाणेच तिथली झाडं सुद्धा इतिहासाची साक्ष देत होती. त्यांचे नैसर्गिक रित्या कोरले गेलेले खोड सुद्धा नक्षीदार वाढले होते. तिथले सारे सौंदर्य मनात टिपले जात होते.


गाभाऱ्यात जसे पाऊल पडले तसे तिथली निरव शांतता ही बोलू लागली होती. नवी कथा, नव्या कवितेचा शोध सुरु झाला. नदीच्या घाटावर बसल्या असताना भोवतालची सकारात्मक ऊर्जा नकळत मनात रुंजी घालत होती.

एक कुटुंब तिथे दर्शनाला आले होते. एक मध्यम वयीन अपंग मुलगा त्यात होता. त्याला कडेवर घेऊन दोन माणसे आली. मंदिराबाहेर माझा मित्र प्रथमेश सुलेखनात कवी संदीप खरे यांच्या ओळी लिहीत होता. मी वाचत होते.

दशकामागून दशके सरली
अन शतकाच्या गाथा ग
ना वाटांचा मोह सुटे वा
ना मोहाच्या वाटा ग
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला
फरफट अवघी पान जळातून वाही ग
अजून उजाडत नाही...ग

वातावरण काव्यमय झाले होते. कवितेत सांगितल्याप्रमाणे त्या वेळी तिथेच दशकाचा इतिहास सांगणारे मंदिर होते. बाहेर जाणाऱ्या मोहाच्या वाट ही होत्या. काही हुलकावणी देणाऱ्या तर काही अचूक ठिकाणी जाणाऱ्या. वाट शोधण्याचा हा प्रवास तेव्हा सगळेच करत होते. त्या ओळी त्या अपंग मुलासाठी, त्याच्या कुटुंबासाठी, आम्हा सर्वासाठी, मंदिरातल्या देवासाठी... सर्वांसाठीच असाव्यात असे वाटले. खर तर उजाडण्याची वाट सगळेच पाहत होते.




निसर्ग कलेचा निर्माता आहे आणि त्यातून निर्माण झालेली कलाकृती फिसकटलेले चित्र बदलण्याची ऊर्जा सोबत घेऊन येत असते. चित्र बदलण्याची निसर्ग तेव्हा चाहूल देत होता. आम्ही सगळे कवितेत, गप्पामध्ये व्यस्त असताना आत गेलेले ते कुटुंब बाहेर आले. त्यांनी ही कविता वाचल्या. आजूबाजूची सगळी मंडळी गर्दी करू लागली. पाहता क्षणी त्या कलाकृतीने त्यांच्या मनात जागा निर्माण केली. त्याचे फोटो काढले गेले आणि नवे लिहिण्यासाठी ओळी ही आपोआप समोरून आल्या. कवितेचा उत्सव साजरा झाला. पुढ्यात नदीचा प्रवाह न्याहाळत आमची बराच वेळ तिथे चर्चा झाली. त्या मंदिराविषयी, तिथल्या जागेविषयी.


तेव्हा वाटले, आपल्यात ही अशा किती तरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या प्रकाशात येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना ही फाटे फुटले. तिथपर्यंत पोहोचण्याचे अंतर कमी झाले. तिथल्या नदीच्या प्रवाहाला पाहताना, तिथल्या झाडाच्या खोडात निर्माण झालेल्या कलाकृतीला पाहताना, आपल्या आजवरच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना कुसुमाग्रजांच्या ओळी त्या शांततेत ऐकू आल्या...


शून्या मधली यात्रा

वाऱ्यावर एक विराणी

गगनात विसर्जन होता

डोळ्यात कशाला पाणी...


मनात विचार आला कि, डोळ्यासमोरची नदी, आकाश आणि त्याला समांतर आपले जग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रदीर्घ यात्रा आहे. ही यात्रा आता आपल्या मनाच्या गाभाऱ्यात पोहोचली आहे. तिथे नुकतेच उजाडले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते मनाच्या गाभाऱ्यापर्यंत येण्याचा हा प्रवास होता.



3 comments:

Daidipya Joshi said...

छान 🙏

Things and Thoughts said...

मंदिराचं वर्णन फारच अप्रतिम आणि ओघवतं...
कुठं आहे हे मंदिर?

जुईली अतितकर said...

पनवेल जवळ गुळसुंदे या गावात नदी तीरावर हे पौराणिक मंदिर आहे. अतिशय छान ठिकाण आहे.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...