आपल्या भोवतालचे वातावरण, आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण यांचा आपल्या विचारांवर, प्रगतीवर आणि जगण्यावर दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात प्रभाव पडत असतो. रोजच्या रुटीन मधून बदल म्हणून आपण एखाद्या जंगल सफारी किंवा उद्यानाला भेट दिली असेल. तिथून आल्यावर आपण उत्साहाने नव्या जोमाने पुन्हा आपले काम सुरु करतो.
घनदाट वन, पर्यावरण आणि वातावरणातला बदल मानवी जीवनावर अंत्यत खोलवर परिणाम करतो, त्यामुळे त्याचे संवर्धन आणि वनीकरण यावर प्रकाश टाकणे ही तितकेच जरुरीचे आहे.
सध्याच्या घडीला वातावरणात, ऋतूचक्रात क्षणा क्षणाला होणारे बदल या विषयाला आणखी गंभीर रूप देत आहेत. आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर विविध संस्था या विषयावर जागरूकतेने कार्य करत आहेत. आपल्यातील अशी अनेक उदाहरणे पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देत आहेत. त्यातलेच एक उदाहरण म्हणजे कर्नाटक राज्यातील होन्नाली गावातील तुलसी गौडा.
तुलसी गौडा यांचा जन्म १९४४ साली हलाक्की या आदिवासी जमातीतील कुटुंबात झाला. अंत्यत हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. बालपणीच त्यांच्या डोक्यावरचे पितृ छत्र हरपले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईवर आणि पूढे त्यांच्यावर पडली. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या कष्टप्रद जीवनाला सुरुवात झाली. त्यांच्या आई सोबत त्यांनी नर्सरीची कामे करायला सुरुवात केली. घरची परिस्थिती नसल्याने त्यांना शालेय शिक्षण मिळू शकले नाही. अक्षर ओळख आणि पारंपरिक शिक्षण हे सारे त्यांच्या जवळ नव्हते. तरीही त्यांच्या मनातल्या कुतूहलाने आशा सोडली नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणातून आणि त्यांच्या कामातून त्या शिकत राहिल्या.
तुलसी गौडा यांना " एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट " अशी ही ओळख पुढे मिळाली. कोणत्याही नव्या झाडाचे मातृ झाड म्हणजे ज्या झाडापासून ते झाड आले आहे ते झाड त्या ओळखून सांगत. भूमिगत पेरे म्हणजेच नोड्स या दोन झाडांना जोडण्याचे कार्य करतात. दोन झाडांमधील पोषक घटकांची देवाण घेवाण या संपर्कातून होत असते. त्यातला दुवा ओळखून त्या झाडाचे बी बियाणे मिळवणे, त्यांचे जतन करणे, संगोपन करणे, त्यातून नवे रोप तयार करणे अशी कामे तुलसी गौडा यांनी अनेक वर्ष केली. अनेक दुर्मिळ बी बियाणांची आणि औषधी वनस्पतींची त्यांना सखोल माहिती होती. नर्सरीत कामे करून आणि झाडांशी मैत्री करून त्यांनी झाडाविषयीचे सखोल ज्ञान ग्रहण केले. झाडांच्या सहवासात राहून आत्मीयतेने सारे फुलवले आणि वाढवले. वन विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. तुलसी गौडा यांचे वनस्पती शास्त्रातील सखोल ज्ञान तसेच जंगल, झाडे आणि वृक्षारोपण याविषयीची आस्था पाहून कर्नाटक वन विभागात त्यांना कायम नोकरी देण्यात आली. साठ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास १, ००, ००० झाडे लावली आणि त्यांचे जतन केले.
वन संवर्धनासाठी आणि वनीकरण मोहिमेसाठी त्यांच्याकडची माहिती तसेच त्यांचे मार्गदर्शन वन विभागासाठी बहुमोल ठरले.
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या कार्यासाठी तुलसी गौडा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यांचे झाडांविषयीचे कुतूहल, त्यांच्याकडचा माहितीचा खजिना आणि झाडांविषयीची आत्मीयता पुढच्या काळात अनेकांना प्रेरणा देत राहिल. झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा तुलसी गौडा यांनी इतरांना पर्यावरण पूरक आणि शाश्वत जीवन पद्धतीने जगण्याचा दृष्टिकोन दिला. मानवी जीवन, माणसाच्या भावना, आणि त्याचे ज्ञान हे पर्यावरणाशी कसे जोडलेले आहे हे तुलसी गौडा यांच्या खडतर जीवन प्रवासातून तसेच निरपेक्ष भावनेने जपलेल्या, वाढवलेल्या वनराई वरून स्पष्ट होते.