अक्षर ओळख आणि शिक्षण सुरू झाले ती काळ्या पाटीवर. नंतर तीच पाटी आयुष्याचा भाग झाली. तेव्हा श्री गणेशा लिहून सुरवात केलेली पाटी नंतर बरेच काही लिहिण्यासाठी वापरली गेली. ती काळी होती नंतर हळूहळू पांढरी, हिरवी विविध रंगी झाली. नंतर त्याच पाटीवर आपल्या गरजेचा मजकूर लिहून कधी दारावर, भिंतीवर, वेळ पडलीच तर खिडकीवर लावू लागले. जाहिरातींनी, सिनेतारकांनी भरलेल्या भिंती तर खूपदा पहिल्याच असतील. पोस्टर, फलक आणि पाट्या यावर काय काय मजकूर असतो. यावर हा आढावा.
दुकानाबाहेर हमखास दिसणारी ही गोष्ट बऱ्याचदा आपले लक्ष वेधून घेते आणि कायमची लक्षात राहते. त्यात ही विनोदी काही असेल तर हे कायमचे कोरले जाते. सुरवात दुकानाच्या झगझगीत फलकाने होते. बल्बच्या प्रकाशात आपल्या दुकानाला आकर्षक करतात ते नावांचे फलक. जसे एम बी ए चायवाला, बालाजी स्नेक कॉर्नर, खाना खाके जाना डायनींग इत्यादी. दुकानांनंतर आपली नजर जाते ती आपल्या आजूबाजूला असलेल्या गाड्यांवर. काही जणांसाठी गाडी ही वाहन नसून बऱ्याच जणांचे आशीर्वाद असतात. सुरवात देवापासून होते " गणपती, महालक्ष्मी, काळूबाई, वाघजाई प्रसन्न नंतर आपल्या आवडीचे असे तेहतीस कोटी देव. काही पुढच्या काचेवर काही मागच्या काचेवर. त्यात आपले कुटुंब ही आलेच आईचा आशीर्वाद, पप्पांचा आशीर्वाद, आजी, आण्णा, काका, दादा, भाई, ताई जागा राहिली तर आपली मुले आणि नातवंडे ही. असे सगळे देव आणि कुटुंब सोबत घेऊन रोज मैलाचा प्रवास करणारे ते वाहन नसून नवसाचे पोरं वाटायला लागते. आशीर्वाद घेतले पण काही लोक अधिक मजकूर देऊन देशसेवा ही करतात. " पुढच्यास ठेच मागचा शहाणा "
" सुरक्षित अंतर ठेवा " " अति घाई संकटात नेई " हे सगळे लिहून कोणत्यातरी नेत्याची जाहिरात करणारे पोस्टर ही लावलेले असते म्हणजे नक्की हे मजकूर कोणासाठी हे आपणच ठरवायचे. बऱ्याच ठिकाणी कॉलनीत, मोठमोठ्या कंपन्यांच्या बाहेर सूचनांचे फलक लिहिलेले असतात. " येथे वाहन उभे करू नये " बरोबर त्याच्या समोर कोणीतरी नेनो, मारुती उभी केलेली असते. म्हणजे उभे करणाऱ्याला वाचनाची आवड कदाचित नसणार. तसेच काही बिल्डींगच्या बाहेर, बंगल्याच्या बाहेर लिहिलेले असते " फेरीवाले आणि बाहेरचे श्वान यांना प्रवेश निषिद्ध " फेरीवाले ते वाचूनही बिल्डिंग मध्ये येतात. त्या पाटीखाली कुत्रा मात्र शांत बसलेला असतो म्हणजे शहाणे कोण ? त्याला बिचऱ्याला तर वाचता ही येत नाही पाटी. कधी कधी " कुत्र्यापासून सावधान " लिहिलेले असते. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला भेटायला आलो त्याला शोधण्यापेक्षा कुत्रा कुठून येईल का हे पहिले शोधा. काही आठवणीत राहिलेल्या पाट्या म्हणजे गाडीवर लिहिलेलं आहे " बघतोस काय रागानं...overtek केलाय वाघांन ...वाघ पण चित्रातला. एका रिक्षावर लिहिलेलं " भावा तू पुढे जा... तुला असेल घाई, माझ्या घरी वाट बघते माझी आई. " वेगावर नियंत्रण ठेवा " हेच सांगितले पण वाचणारा थोडा बुचकळ्यात पडेल. अगदी विरोधी आहे पण हे दोन वाहने समोर आलीच तर विनोद झाल्याशिवाय राहणार नाही. सिग्नलला थांबल्या असताना एक रिक्षा आणि ट्रक समोर उभे होते. रिक्षावर " ईशीता " एवढेच. बाकी पुढची स्टोरी ट्रकवर " ललकार ", " तुझ्या येणाने जीवनाचं सोनं झालं " अशी प्रेमाची कबुली आजवर कोणत्या चित्रपटात पण पाहिली नसेल. याला योगायोग म्हणावा की आणखी काही माहीत नाही. पण आपली नजर शोधक असली की अशा गमती जमती नजरेतून सुटत नाही. तर या गमती जमतीचा आस्वाद घेत घेत जग जिंकणे हीच आपली मिळकत असली पाहिजे नाही का …

4 comments:
दीदी काय मस्त निरीक्षण आणि तेवढेच उत्तम लेखन...👌👌👌
धन्यवाद ओमकार
मस्त लिहिले आहे...
Thanks तन्मयी
Post a Comment