नव्या घराचा शोध...कुणासाठी नव्या जागेचा शोध आणि कुणासाठी आपल्या आंनदाचा, भरभराटीचा, स्वप्नांचा शोध... घराचा शोध हा प्रत्येकासाठी त्याचा त्याच्या आवडी निवडीचा शोध असतो. कधी दिशा पाहून तर कधी रस्ता म्हणजे कनेक्टिव्हिटी पाहून आपण जुळवून आणलेलं गणित.
अनेक घरं पाहिल्यावर योगायोगाने एखादे नजरेत भरते. काळजात उतरते आणि सत्यात साकारते. कधी हो – नाही म्हणता म्हणता आशा निराषेच्या रणभूमीवर आपला कधी विजय होतो. घराचा शोध संपतो.
घराच्या शोधाचा प्रवास सुरु होतो. आपली आजवरची गाऱ्हाणी, आजवरची जमापुंजी मनात किंचित धाकधूक असते. अशा वेळी एखाद्या गगनचुंबी इमारतीच्या आलिशान लॉबी मध्ये गेल्यावर आपलं मन आपोआप जमा खर्चाचा हिशेब आणि कौटुंबिक गणित मांडायला सुरवात करते. व्याज, मुद्दल, कर्ज, सरकारी दाखले आणि स्वप्न याची गोळा बेरीज होते. एका थंडगार खोलीत घराची प्रतिकृती पाहायला मिळते. कधी त्याची चित्रफीत समोर दिसते. त्यातच आपले स्वप्नांतले घर दिसते. आपण त्यात क्षणभर रमुन जातो. एक आलिशान काल्पनिक दुनियेची सफर करून आपलं मन स्थिमित होते. एक घर आपल्याला बनताना पाहायला मिळते. तिथली खोल्यांची रचना, चारी दिशांना तयार होणाऱ्या भिंती, घराचे प्रवेश द्वार आणि खिडकीतून दिसणारा सीनिक व्हीवू आपण टिपून घेतो. त्या एका घरासोबत येणाऱ्या विविध सोयी सुविधा आपले डोळे दिपवून टाकतात. शेवटच्या मजल्यावरून दिसणारे भव्य टॉवर, आकर्षक लाइटिंग करून सजवलेले कारंजे, मोठं गार्डन, भव्य प्रवेश द्वार सारे दाखवले जाते. तिथल्या तिथे आपण एक काल्पनिक रपेत मारून येतो. स्वप्नांच्या जगात क्षणभर रमून झाल्यावर आपल्याला प्रतिक्रिया विचारली जाते. तेव्हा आपण जागतिक प्रश्न असल्यासारखे “ विचार करून सांगतो “ एवढं बोलून तिथून काढता पाय घेतो. आपण ते स्वप्नांतलं घर मनात घोळवत घोळवत माघारी येतो. कुटुंबासोबत रात्री जेवायला बसताना आपण पाहिलेल्या घराची सारी गोष्ट सांगून जेवायला सुरुवात करतो. आईने हौसेने ताटात वाढलेल्या वरण भाताने आपण तृप्त होतो. आपल्या ताटात वाढताना तिच्या डोळ्यात तेव्हा एक मायेने भरलेलं घर दिसतं आणि आपण सारे विसरून मनोमन खुश होतो.
No comments:
Post a Comment