Tuesday, 28 July 2020

चारचौघी


   एका हातात चहा चा कप आणि दुसऱ्या हातात नवं कोरं भेट मिळालेलं कवितेचं पुस्तक घेऊन मी खिडकीशी बसले होते. आजूबाजूला नजर गेली आणि खालच्या कट्ट्यावर चार चौघी दिसल्या. आज बऱ्याच दिवसांनी आल्या होत्या. आधी दोघीच होत्या मग अजून एक, दोन आल्या. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा नव्या उत्साहात, नव्या विषयांवर आपले सोशल डिस्टन्सचे नियम पाळत आपली रोजची दुखणी, अडचणी, फसलेले बेत, हसलेले दात, रुसलेले अहो, पोराबाळाची भांडण, त्यातून सूट तर जगाची चिंता, एक ना अनेक किती विषय सोबत घेऊन आलेल्या. सध्याचा ज्वलंत विषय “कोविड “ तो ही होताच.
मनुष्याला दिलेली ही दैवी देणगी म्हणजे एकमेकांमधला संवाद, विचारांची देवाण घेवाण, गप्पा, चर्चा. सोशल डिस्टन्स च्या सावटाखाली जर कोणाचे वांदे झाले असतील तर या कट्ट्यावरल्या ताई – माई, आक्काचे. आबा, आजोबा, मामांचे. ज्याची रोज संध्याकाळ त्यांच्या मित्र मैत्रिणीसोबत जायची. काय करावे आता आणि कसा जमवावा बरे आपला गोतावळा. यक्ष प्रश्न. घरी बसलेल्या सगळ्यांनाच सतावत होता. त्यांना पाहून पूर्वीचे दिवस पुन्हा आले याचा आनंद हि झाला. सगळ्या शहराची एका आठवड्याची हिस्ट्री सवयीप्रमाणे आपोआप चर्चेत येत होती. समोरचीच्या कानावर आदळून पुन्हा नवे काही तरी निर्माण करत होती. एक एक करत लॉक डाऊनचा सगळा दिनक्रम सांगून झाला. साडी चॅलेंज पासून ते दूधवाला गावी पळाला पर्यंत. सगळे सगळे मनीच्या गुलदस्त्यातल्या गुजगोष्टी सांगून झाल्या. नेहमी डोक्यावर पदर घेणारी वयस्कर आजी पदराचा मास्क करून बोलत होती. कधी ओढणीचा वापर न करणारी आंटी आज त्याच ओढणीचा मास्क करून लावून आलेली. कधी नव्हे ती शर्मांची घुंगट मधली बहुरानी आज पंजाबी ड्रेस मध्ये पाहिली आणि तिच्या सुंदरतेवर मी ही भाळले. बाकी दोघींनी तेवढा मास्क लावला होता. कदम काकू खूप धडाडीच्या. मास्क वैगेरे काही नाही. रुमाल तेवढा हातात ठेवलेला तो ही औपचारिकता म्हणून असेल. नाहीतर “ खतरो के खिलाडी ” असे हे व्यक्तीमत्व. एवढं करून एक मीटरच अंतर ठेवून सुरू झालेले हे चर्चासत्र लांबून म्हणता म्हणता एक तासभर झालं. सोशल डिस्टसिंगला धाब्यावर ठेवून हे अंतर कधी कमी होत गेलं, कसे ते त्यांना ही कळलं नाही आणि लिहिता लिहिता माझं पान भरलेलं मलाही कळलं नाही. सांगायचं एवढंच अवघाची संसार एकवटला भूवरी…गप्पाच्या मैफिली रंगल्या आज पुन्हा कट्ट्यावरी....!

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...