Wednesday, 29 July 2020

शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

      शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेला काल गेले होते. नव्याने जरी आले असले तरी त्यातलीच एक होऊन गेले. रात्री तिथला अनुभव लिहायला घेतला. काही आठवणीत राहिलेल्या गोष्टी आपोआप कागदावर उतरत गेल्या. सुरुवातीला शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा सत्र झाले. मध्यान्ह झाल्यावर शिक्षक आणि विदयार्थ्यांमधल्या मानसिकतेवर भाष्य करणारे दोन चित्रफीत आणि फोटो दाखवले. त्यातला एकात काचेच्या फिश पौंड मधून समुद्राच्या लाटांवर उसळी घेणारा गोल्डन फिश होता, तर चित्रफितीत नवजात पक्षाचे उडण्यासाठीचे प्रयत्न दाखवले होते, ज्यात तो बराच प्रयत्न करून हि उडू शकत नव्हता. शेवटी दूरवरून एक पक्षाचा थवा त्याच्या जवळ स्थिरावला आणि ना उमेद झालेला पक्षी थव्याच्या बळावर पहिल्यांदा उडायला शिकला. ही दोन उदाहरणे लहान मुलांसाठी समर्पक आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहेत. पण फक्त लहानासाठी का? ही त्या मानसिकतेची परीक्षा होती किंवा शिक्षकांची. आयुष्यात लहानपणी लहान सहान अनुभवातून मिळणारे धडे किती खोलवर बदल घडवू शकतात हे समाजाचा भाग होताना कळते. कोणतेही काम नव्याने सुरू करायचे किंवा आहे ते पूर्णत्वास न्यायचे म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्य ही गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित ठेवण्याचे काम आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती करते. फिशपौंड मध्ये असलेला मासा दिसायला सुंदर होता पण त्याच विश्व पण तेवढंच संकुचित होतं. त्यामुळे अथांग समुद्र पाहून त्याची ओढ वाटणे किंवा मोकळे आकाश पाहून पक्षाला उंच उडण्याची इच्छा होणे हे ही स्वाभाविक वृत्ती आहे. जी तुमच्या आमच्या सारख्या माणसांमध्ये ही दिसून येते. जेव्हा ह्या गोष्टी सत्यात उतरण्याची वेळ येते तेव्हा दुरून डोंगर साजरे असे ही वाटते. या पसाऱ्यात आपले अस्तित्व हरवले तर अशी भीती मनात खोलवर कुठेतरी उपजत असते. मग तो समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटांवर स्वार होणारा मासा असो किंवा आकाश कवेत घेणारा पक्षी किंवा माणूस. एखादे काम हातात घेतले तर ते काम मी का करावे? किंवा खूप मेहनत घेतली तर का घेतली ? असा विचार एकदा तरी मनात येणं साहजिकच आहे. त्या “ का “ चे उत्तर एकदा मिळाले की गोष्टी सहज आणि सोप्या होतात. मग तो का फक्त आपल्या पुरता मर्यादित असेल तर मात्र ते काम आपण तो पर्यंत करतो जो पर्यंत आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही. आणि एकदा त्या व्हायला लागल्या की हळूहळू ती गोष्ट क्षुल्लक वाटू शकते. त्याचे आपल्या कडुन महत्व कमी झाले की प्रयत्न संपतात. तिथेच त्याला पूर्ण विराम मिळतो. हे चक्र फक्त आणि फक्त 'का' या प्रश्नावर अवलंबून असते.
जर योग्य वेळी त्या 'का' ला शांत करून त्याचे कारण स्वतः ला पटवून दिले की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच. माश्याला का पोहवेसे वाटले लाटांवर आणि पक्ष्याने झेप का घेतली आकाशात? खरंतर पोहणे आणि उडणे त्यांचे स्थायी स्वभाव होते तरीही वेळ का घेतला तर त्या विस्तीर्ण विश्वाची त्यांना कल्पना नव्हती जी तिथल्या पोहणाऱ्या इतर माश्यांनी आणि उडणाऱ्या पक्ष्याच्या थव्याने दिली. पुढे तोच समूह ज्यात त्यांना हरवण्याची भीती होती तोच त्यांची ओळख बनला. एकट्या पोहणाऱ्या गोल्डन फिशची किंवा रंगबेरंगी पक्ष्यांची सुंदरता समूहाने क्षुल्लक केली तरी आकाशात उंच भरारी घेणारा पक्षांचा थवा जास्त आकर्षित वाटू लागला. हीच दृष्टी आपल्या मनात रुजवणे त्याला खतपाणी घालणे आणि त्यातून फुलणाऱ्या पालवीतून डेरेदार वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया फक्त आणि फक्त ' का ' या प्रश्नावर थांबते. आपण ते उत्तर शोधण्याच्या प्रवासात अनुभवानी परिपूर्ण होत जातो. ही वाट आपल्यातल्या विद्यार्थ्याची. त्याला जागृत ठेवण्याची… हो ना.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...