“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होता नाम घेता फुकाचे, जीवन करीची जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म " मधल्या सुट्टीची एकदा बेल झाली की एकसुरात ही प्रार्थना म्हणायची आणि प्रत्येकाच्या डब्यावर ताव मारायचा. आपल्या पोटाला आणि घरी आईला खुश करून रिकामा डबा पुन्हा घरी जायचा. आपला डबा उघडण्याची उत्सुकता आणि मित्रमैत्रीणीच्या राऊंडात बसून एक एक करत सगळे जेवण व्हायचे. आज कँटीन मध्ये डबा उघडला, आणलेली खिचडी पाहिली. शेजारी बसलेल्या ताईंनी “ आज संकष्टी का? “ विचारलं.
खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी लहानपणीपासूनच उपवासाची आणि व्रत वैकल्याची वाट पाहायला लागायची. घरच्या गृहिणीची आणि देवाची साथ असेल तर खिचडी ठरलेली.
आता नुकत्याच सुरू झालेल्या दिवाळी सणाची रंगत वाढवण्यातही फराळाचे अनन्य साधारण महत्व आहे. चकली, चिवडा, करंजा, लाडू अशी भरगच्च पौष्टीक मेजवानी दिवाळीत असते. मोदकाशिवाय गणपती, पुरणपोळी शिवाय होळी, तिळगुळ आणि संक्रात, वेगळंच त्याच्यात नात, अशी सणाची आणि या खाद्यपदार्थांची जोडगोळीच म्हणावी लागेल. " खाणार त्याला देव देणार " अशी आपली भारतीय सण समारंभाची रेलचेल, त्यामुळे " मस्त खा आणि मस्त राहा " इतकं साधं जगण्याचं लॉजिक फोलो करणारे आपण ताटातील वरण भात ही तितक्याच आत्मीयतेने खातो. जेवणाविषयी किंवा आपल्या रोजच्या आहाराविषयी बोलायचे झाले की हमखास निघणारा विषय म्हणजे वजन आणि डाएट... वाढलेले शारीरिक आणि मानसिक आजार याची जर एखाद्याने कारण शोधली तर त्याचे मूळ हे आपल्या ताटात आणि पोटात मिळते. बऱ्याच वेळा आपल्याला त्या पदार्थाची नक्की चव ही कळत नाही, फक्त पोट भरत. पदार्थाची चव तेव्हाच कळते जेव्हा डोळे, जीभ, नाक, आणि शेवटी पोट अशा सगळ्यानी चाखून पहिले जाते, खाल्यावर पुढची दहा मिनिटं तरी त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते " पोट भरलं पण मन नाही " अशी दाद आपोआप समोरून येते. तेव्हा कुठे ताटातले अन्न पूर्णब्रह्म होते.
2 comments:
सुंदर
धन्यवाद भावेश सर
Post a Comment