माणूस जरी सामाजिक प्राणी असला तरी प्रत्येकाचा स्वभाव आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. माणसाचे स्वभाव तर ब्रह्मांडातल्या ताऱ्यासारखे विभिन्न असतात. त्यांची गणतीच होऊ शकत नाही. प्रत्येक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते. अगदी जुळी भावंड सुद्धा स्वभावाने वेगळी वाटू शकतात. म्हणूनच प्रत्येक माणूस समाजाशी, आजूबाजूच्या लोकांशी कसा जोडला जाईल ते सांगता येत नाही.
कॉलेजात पहिल्याच दिवशी योगायोगाने मला एक मैत्रीण भेटली. त्याच दिवशी अर्धा अधिक क्लास तिला माहीत झाला होता. तिच्याशी बोलायला येणारे अगदी पहिल्याच दिवसापासून भरपूर. माझं गणित जरा वेगळं होतं. मी तशी अबोल पण तिच्या माध्यमातून मला ही वेगवेगळी माणसे कळू लागली. त्यांच्यातले वेगळेपण मी ही शोधू लागले. समोरच्यातले वेगळेपण वाचता आले पाहिजे हे मी त्यातूनच शिकले. समाजात वावरायचे आणि प्रगती करायची तर विविध रंगी, विविध प्रकारची माणसे वाचण्याचे हे शिवधनुष्य उचलावे लागतेच. मग त्यासाठी दहा दिशा आपल्याला खुल्या असतात. आपण योग्य त्या रस्त्यावर चालायचे असते.
खूपदा मला आपल्या संवादातल्या भाषेविषयी प्रश्न पडतो.
माणसा माणसाला जोडणारी ही भाषा शैली नसती तर आपण या समाजात कसे राहिलो असतो ? एकमेकांचे विचार कसे मांडले असते ? तेव्हा एकमेकांशी आपण कसे जोडले गेलो असतो?
यावरून एक प्रसंग आठवला. एक रस्त्यावरचा कुत्रा गेट पाशी नेहमी बसलेला असायचा. बाहेरची कोणतीही व्यक्ती असो तो कुत्रा भुंकायचाच. मागेच लागायचा पण नेहमीच्या चेहऱ्यावर कधीच भुंकत नसे. त्याला ओळखीचे चेहरे शोधण्याची कुठली भाषा माहित असावी?
समोरच्या घरात रोज सकाळी दाणे खायला चिमण्या, कबुतर, कावळे येतात. तेही न चुकता. भाषा माहित नसून हे कसे जुळून येते? या नात्याची ओढ कशी निर्माण झाली ?
जवळच्या व्यक्तीशी, वस्तूशी, पशु-पक्ष्यांशी जुळवून घ्यायला भाषा तर हवीच. मग ही भाषा कधी कधी आपल्या सवयीतून, वागण्यातून, कृतीतून आपोआप येत जाते. शब्द हे तर माध्यम. शब्द विचार प्रकट करण्याचे साधन असले तरी आपल्यातील आपुलकी, प्रेम, दया, नम्रता हीच त्यातील गुप्त भाषा होते.
आपला हा संवाद सुरु असतो, कधी रस्त्यात भेटलेल्या जुन्या मैत्रिणीची खुशाली विचारून. कधी कोणाला मदतीचा हात पुढे करून. कधी आपले विचार परखड पणे मांडून. तर कधी फक्त कोणाशी मनातले बोलून. संवाद हा हवाच मग तो शाब्दिक असो किंवा कृतीतून.
माझा हा संवाद शांत असताना सुरु असतो. कधी तो माझा माझ्याशी असतो तर कधी इतरांशी. माझ्या स्वाभाविक गोष्टीशी. सवयींशी. तर कधी दुसऱ्याच अनोळखी मनाशी. व्यक्त व्हायला खरच भरपूर ठिकाणे असतात ना...
No comments:
Post a Comment