Saturday, 12 September 2020

मनोगत : एक होता कार्व्हर

    नुकतेच वाचण्यात आलेले पुस्तक “ एक होता कार्व्हर “ पहिल्यांदाच जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा कार्व्हरच्या कारकिर्दीने मला झपाटून टाकले. मग हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचायला घेतलं ते त्यावर लिहिण्यासाठी..
 लहानपणी परिकथेच्या पुस्तकांसोबत वेगवेगळी इन्स्पिरेशनल पुस्तक वाचायची आवड होतीच. त्यात माझ्या वाट्याला आलेले एक कलामांचे “ माझी जीवन यात्रा “ आणि दुसरे म्हणजे “एक होता कार्व्हर...”
खर तर हे दोन्ही माझ्यासाठी आयडॉल झाले ते त्यांच्या सामान्य राहणी आणि असामान्य कार्यामुळे. कदाचित म्हणून मनात घर करून राहिलेली ही पुस्तके कायम लक्षात राहिली.
एक होता कार्व्हर दुसऱ्यांदा वाचून झाले. मग या पुस्तकावर मनोगत लिहिण्याचे ठरवले. वीणा गवाणकर यांच्या अनुवादीत शब्दातला कार्व्हर माझ्या मनापर्यन्त पोहोचला.
गुलामगिरीच्या हिंसक जाचातून आपला देश भरडून निघाला, हा इतिहास आपल्याला माहित आहेच. त्याचे दाखले भारतीय इतिहासात मिळतात. गुलामगिरी इतर देशात ही दहशत निर्माण करत होती. त्यातून तिथे ही धडाडीचे क्रांतिकारक जन्माला आले. त्यातलाच एक क्रांतिकारी विचार घेऊन आलेला मुलगा. त्याची ही कथा.
गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या एक जिज्ञासू आणि व्यासंगी व्यक्तीचे नाव “ जॉर्ज वोशिंग्टन कार्व्हर “ त्याची ओळख “ मेरिच पोर “ अशी ही होते.
मेरी हे त्याच्या जन्मदात्री आईचे नाव. अगदीच लहान वयात म्हणजे दोन महिन्याच्या बाल्यावस्थेत असताना त्याच्या आईपासून त्याची ताटातूट होणं. श्वासावर उरलेला मरणोन्मुख जीव उमद्या घोड्याच्या बदल्यात सोडवून घरी आणून पोसणे हे साधारण नाही.
पोरकेपणाच्या या दरीत एक एक करत आपले कलागुण, आपली जिज्ञासू वृत्ती या जगाच्या कल्याणासाठी वापरणे. ते ही स्वतः ची झोळी फाटकी असताना करणे हे आजच्या जगात खर तर रोमांचकारी स्टंट पेक्षा काही कमी नाही.
कार्व्हर ... ज्याने आपल्याच आईला आपल्या डोळ्यासमोर गुलामासारखं उचलून नेताना पाहिलं. आपल्याच आजूबाजूच्या लोकांकडून “ हा निग्रो (काळा) ज्याला धड बोलताही येत नाही तो शिकून काय करणार? “ अशा प्रश्नार्थक नजरांना पाहिलं. कडाक्याच्या थंडीत जेव्हा लोक घराबाहेर पडणं ही मृत्यूची घंटा समजत अशात हा भटकंती करत परगावी जाऊन शिकण्याचे धाडस करतो. एक निग्रो जेव्हा आपल्या फक्त काळ्या रंगावरून जेव्हा गोऱ्याच्या जल्लोषात आपल्याच बांधवांना आगीच्या निखाऱ्यात पेटताना पाहतो. अशा परिस्थितीत पुढे जाऊन शिकायचे आणि या जगाला शिकवायचे धाडस करणारा हा कार्व्हर. त्याने ते करून दाखवले. चित्रकला, संगीत, विणकाम, रंगकाम, वेळ पडलीच तर स्वयंपाक आणि कपड्यांची धुलाई. मिळेल ते सगळं काम केलं. हे एवढं करून नम्रतेने ज्या घरात राहिला त्यांची सेवा केली. ह्या जगाच्या पसाऱ्यात या अनुभवासोबत भेटणाऱ्या एक एक चेहऱ्याने त्याला मेरीची आठवण करून दिली. कदाचित त्याने आईचा चेहरा ही नीट पाहिला नसेल. पण आपली आई अशीच असेल का ? तिचा आवाज... तिच्या केसांचा रंग कसा असेल ...मला इथेच कुठेतरी ती भेटेल का ? या वेड्या आशेवर त्याने सुजनबाईचे विणकाम केले. मारियाआत्यासाठी बायबल वाचले. पेन बाईसाठी ब्रेड, पुडिंग, बिस्कीट बनवायला शिकला. डायमंड ग्रुव्ह वरती त्याला शिकवलेले चित्रकलेचे बारकावे, श्रीमती बड यांच्या साकारलेल्या कलाकृती, पियानोवर फिरणाऱ्या त्याच्या बोटांना लय देणारे सौ मिलहॉलंड याचे स्वर. एक ना अनेक या सगळ्यांमध्येच तो मेरीचा अंश शोधत होतो म्हणूनच अनंतात विलीन झालेला तिचा जीव तेव्हा सुखी झाला असणार. या सर्वांच्या मध्ये राहून मनातलं पोरकेपण त्याने केव्हाच दूर लोटले होते. जगाला जवळ करण्याची किमया या काळ्या कातडीच्या आड लपलेल्या त्या माणसामध्ये नक्कीच होती. गुलामगिरी असावी तर दारिद्र्य आलं आणि अचानक ती नाहीशी व्हावी आणि स्वातंत्र्य मिळावे तर वर्षानुवर्षं गुलामासारखे झिजणारे हात योग्य मार्गांवर लागतील का? हा प्रश्न समोर होता. स्वयराचार होऊ नये म्हणून एखादी आई ज्या प्रमाणे कसे राहावे, कसे बोलावे ? शिकवते त्याप्रमाणे नुकताच गुलामगिरीतून मुक्त झालेल्या अलबेमा शहराला आपले मुल समजून आईच्या मायेने कार्व्हरने वसवले आणि घडवले.
हे हात जे कागदावर रंगानी काहीतरी निर्माण करत होते. ते खर तर वास्तवात निर्मितीक्षम आहेत. या निसर्गात काही तरी नवीन, काही तरी वेगळं निर्माण करण्यासाठी जन्माला आलेले हे लांब सडक बोटं नक्कीच त्या रचनाकर्त्याची आगळी वेगळी चमत्कृती आहे हे त्याच्या हर एक कामातून त्यांनी जनतेला दाखवून दिले.
 उदाहरण द्यायचं तर त्यानी लहानपणी परसदारी फुलवलेली बाग असो किंवा टस्कीगी मधल्या निष्क्रिय, निकृष्ठ दर्जाच्या नापीक झालेल्या जमीनीवर घेतलेली पिके, ज्यावर पुढे जाऊन त्यांच्याच निग्रो विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दगड विटांनी उभारलेली विद्यालयाची इमारत असो किंवा त्याच्याच घामातून येऊ घातलेली शेंगदाणा, कापसाची शेती. आज जे आपण प्रोसेस केलेलं अन्न घेतो त्याची सुरुवात तिथून झाली असावी. “आपले हात “ “ काळे हात “ ही निर्मिती क्षम असू शकतात ते नवे उत्तम जग उभे करू शकतात. नव निर्मिती करू शकतात. आपलेच हात आपल्या लोकांचं पोट भरू शकतात. “ हा आत्मविश्वास आपल्या अशिक्षित बांधवांमध्ये निर्माण करणारा तो समाजोपयोगी माणूस होता. आताच्या भाषेत सांगायचं तर त्यांचा “ नेता “ म्हणून कार्व्हर कायमच लक्षात राहील.
एकच ठरलेला पोशाख आणि त्यावर विज्ञान आणि ज्ञानाची झळाळी त्याच्या व्यक्तिमत्वाला चार लोकांत नक्कीच असामान्य करते. कोणे एके काळी सांभाळकर्त्या मोझेस बाबांच्या सदऱ्याचा गणवेश करून एक पाटी आणि यायगरने दिलेलं एक पुस्तक दोन सफरचंद आणि जुनाट बूट ते ही खराब होऊ नये म्हणून खांद्यावर घेऊन एकटाच या जगात लिहायला, वाचायला, शिकण्यासाठी निघालेला कार्व्हर उद्या कित्येकासाठी प्रेरणा होऊन उभा राहिलं. असा विचार तेव्हा त्याच्या मनात आला असेल का?
“ जो निसर्गाच्या प्रेमात पडून त्याच्याशी जवळीक साधतो, निसर्ग त्याच्याशीच गुजगोष्टी करतो “ हे त्यांच वाक्य त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी निर्माण झालेली अनास्था आणि अढी दूर करण्यासाठी पुरेसे होते.
पुस्तकाच्या शेवटी लिहिलेलं एक वाक्य सुद्धा त्याचे व्यक्तिमत्व विषद करते.
“He could have added fortune to fame …
But caring for neither
He found happiness and honour
In being helpful to the world …”
आपले नाव आणि प्रसिद्धी हे जर प्रमाण मानले तर ते त्याने केव्हाच गाठले होते. पण त्याला लोकांची गरज पूर्ण करण्यातच धन्यता वाटली. कदाचित म्हणून सामान्य राहून कार्व्हर असामान्य वाटला.
भावी पिढ्यामध्ये जबाबदार नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायला हवे असे हे पुस्तक.
जेव्हा आपल्याला वाटेल, आपली या जगाला काही गरज नाही किंवा आपल्याला या जगाची गरज उरली नाही. तेव्हा हाती घेण्यासाठीचे हे पुस्तक किंवा जेव्हा आपल्याकडे आहे ते ज्ञान भरपूर आहे हा अहंकार किंवा आपल्याला काहीच येत नाही हा न्यूनगंड मनाला शिवून जाईल अशा वेळी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. जेव्हा आपल्या जवळच्या माणसांना आपण हरताना...झुरताना बघतो पण बघण्याशिवाय आणखी काही करू शकत नाही. तेव्हा हे पुस्तक त्यांना ऊर्जा देईल. कदाचित एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्यातला कार्व्हर जागा होईल आणि यामुळे समाजाने तोडलेले, नाकारलेले, हरवलेले लोक, काही दगडाच्या खाणीतले हिरे आपल्या ही हाती लागतील. जे आजवर जगाने पाहिले ही नसतील. त्यातला एक हिरा तो ही होता...कार्व्हर...

3 comments:

Sayali Chougule said...

कमाल लिहिली आहेस ग 😍

Unknown said...

या पुस्तकाशी माझे एक वेगळेच नाते आहे. ते म्हणजे असं की माझ्या आयुष्यातील वाचलेलं पहिलं पुस्तक म्हणजे "एक होता कार्व्हर". नववीत असताना वर्गशिक्षकांच्या सांगण्यावरून हे पुस्तक वाचायला घेतलं, तेव्हा खरंच ते योग्य वयात वाचलं गेलं, याची जाणीव आता होत आहे. माणसाने माणूस म्हणून कसे जगावे आणि त्यासोबतच इतरांना माणूस म्हणून कसे जगवावे, हे या पुस्तकातून समजते. थोडक्यात पण अगदी छान सारांश मांडला आहेस तू. पुढील वाटचालीसाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा☺️👍

जुईली अतितकर said...

धन्यवाद आकाश. एक प्रेरणादायी पुस्तक वाचून त्याविषयी लिहिताना नक्कीच सामाजिक जाणिव जागृत होते.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...