जेवणाची ताटं घेतली. सगळे एकत्र जेवायला बसले. पहिला घास घेतला आणि “ वाह...आजची भाजी काय मस्त झाली ! “ उत्फुर्त प्रतिक्रिया आपसूकच तोंडून आली. त्याच दिवशी दुपारी जेवणं आटोपून “ लंच बॉक्स “ हा चित्रपट घरी सर्वांनी पाहिला.
व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याची वाट त्याच्या जेवणातून जाते. माणसाच्या आयुष्यात नकळत आलेले “ सुख “ आयुष्याची दिशा बदलते. चित्रपटाची सुरवात जेवणाच्या डब्यानेच होते. डब्यातल्या चविष्ट जेवणावरून एखाद्या गृहिणीच्या आयुष्यात कसे बदल होऊ शकतात हे बदल यात पाहायला मिळाले.
मुंबईत आणि मुंबईतील सामान्य नोकरदार वर्गात वेळेत डबा पोहोचवायचे जिकिरीचे काम करतो तो डबेवाला. याच डबेवाल्याच्या एका चुकीच्या डब्याने कथा कशी रंगत जाते हे पाहण्यासाठी नक्की हा चित्रपट पहावा.
चित्रपटात “ गलत ट्रेन कभी कभी सही जगह पहूचा देती है “ हे वाक्य कथा शेवटाला येताना खूप काही सांगून जाते. एका चुकीच्या पत्त्यावर पोहोचलेला चविष्ट जेवणाचा डबा एका धीर गंभीर माणसाला रसिक आणि आनंदी करू शकतो. हे त्या गृहिणीचे यश. डबा घेणारा मिळालेल्या डब्यातले पदार्थ चाखून तिखट, मीठ योग्य प्रमाणात असल्याचा अभिप्राय देत असतो किंवा पदार्थ चविष्ट झाल्याची दाद देत असतो तशीच कथा पुढे जाते. हा अभिप्राय देण्यासाठी डब्यातले पत्र असते. ते पत्र तितक्याच उत्सुकतेने तिच्याकडून वाचले ही जाते. शेजार धर्म आणि प्रेमाची देवाण घेवाण वरच्या मजल्यावरून खाली टोपलीतून होऊ शकते हे त्यात वेगळेपण होते. संसारिक जीवनात नातेसंबंधावरचा विश्वास उडत असताना आपली हरवलेली मोकळीक शोधण्याचा प्रवास. त्याची जाणीव करून देणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या हातचे जेवणारी ती अनोळखी व्यक्ती “साजन फर्नांडिस “ आहे हे त्या गृहिणीला कळते. वयाचे अंतर कमी करत आपले मन मोकळे करणारा लंच बॉक्स ती त्यांना पाठवत असते. कामात झोकून दिलेले फर्नांडिस रिटायरमेंट नंतर गावी जाण्याच्या विचारात असताना ते तिथेच थांबतात. त्यांना पुन्हा आपल्या जुन्याच पडक्या घरात यावे असे का वाटले असेल ? त्यांच्या जागी नवख्या व्यक्तीच्या येण्याने त्यांच्या स्वभावात कसा फरक पडत जातो? हे इथे पाहण्यासारखे आहे. पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रेमात पडावेसे वाटेल असा हा लंच बॉक्स. चित्रपटाच्या शेवटी त्या गृहिणीचे घरकुल जरी मोडत असले तरी तिच्या आणि तिच्या लेकीच्या जीवनाला नवीन सुरवात, नवी दिशा मिळते. आपण किती दिवस त्याच चाकोरीत आपले जगणे सुरू ठेवणार. कधी तरी नवी सुरवात कधी तरी करावीच लागते. “ सुना है भूतान मे रुपये की किमत कम है, लेकिन वहा सब हॅपी रहते है..” म्हणत आपले सुख शोधत ती घराबाहेर पडते. आपले भौतिक सुख ( दागिने ) विकून भूतानला जाण्याचा विचार करते. हा व्यक्ती त्याच सुखाच्या शोधात नाशिकला आपल्या गावी जाण्याचा बेत सोडून पुन्हा आपल्या त्याच घरी परत येतो. ट्रेनमध्ये ऑफिसच्या फाईल वर भाजी कापणारा त्याचा मित्र, बरोबर जेवणाच्या वेळी केळी सफरचंद घेऊन त्याच लंच बॉक्स वर ताव मारणे असेल. अनाथ म्हणून आलेला शेख ज्याला कोणी आपली माणस नाही, नातेवाईक नाही. त्याच्या लग्नात एका बाजूनं मुलाकडून म्हणजे फर्नांडिस एकटे आणि दुसऱ्या बाजूला एक मोठी फॅमिली. कॅमेराची चौकट आपोआप बदलत जाते आणि नात्यातली माणस आणि प्रेमाने जमवलेली माणस लगेच फरक कळतो.
सुखाच्या शोधात पळून आलेले ते दोघे एकत्र येतात. ते ही फर्नांडिसमुळे, जो स्वतः खर तर निरस व्यक्तीमत्व आहे. मग त्याच्यात ही रसिकता आली कुठून ? हे यात शोधण्याची गोष्ट आहे. म्हणून कदाचित या पूर्ण चित्रपटातली ती एक ओळ आपल्याला सगळं काही सांगून जाते. आपल्याही आयुष्यात असे खूपदा घडत असेल. आपण ही कधीतरी चुकीच्या ट्रेनने प्रवास केला असेल, कधी करियरच्या बाबतीत, कधी मैत्रीच्या बाबतीत, कधी नात्यांच्या बाबतीत... कुठल्या तरी चुकून धरलेल्या गाडीने आपण ही योग्य ठिकाणी पोहोचले असू. तेव्हा मनात हेच आलं असेल “ कभी कभी गलत ट्रेन सही जगह पहूचा देती है...!”
7 comments:
वाह दीदी....
अप्रतिम
Apratim..
धन्यवाद आकाश🙂
धन्यवाद 🙂
धन्यवाद ओंकार🙂
वाह, सुंदर चित्रण. आवडता चित्रपट असल्याने लगेच सगळं आठवत गेलं
Post a Comment