गोल गोल भिंगातून फिरणारी ही दुनिया आपले वर्तुळ पूर्ण करून पुन्हा त्याच जागी आपल्याला आणून ठेवते. मायेची भूक भागवणारी माय लेकराची एक हृदय स्पर्शी कथा असं आपण “ नाळ “ या चित्रपटाचं वर्णन करू शकतो. कधी कधी नात्याची दोर खरंच अशी गुंतागुंतीची बांधलेली असते की परिस्थितीने दूर गेलेले नाते आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात पुन्हा येते. वादळे निर्माण करून जाते. या बदलत्या चक्रात मनाने जोडलेले आपल्याला धरून ठेवते. हे जोडून ठेवणे सहज शक्य होते त्याचे कारण आपल्याशी जोडली गेलेली नाळ
एका गावात गवताच्या झोळ्यानी झाकलेल्या घरात खेडवळ कुटुंबात वाढणाऱ्या चैत्याची गोष्ट. सुरवातीला अगदी सर्व साधारण कौटुंबिक घराची कथा असल्याचे जाणवते. नातेवाईकाच्या गराड्यात कधी आपले हित संबंध चांगले होतात तसेच ते एखाद्या नात्याला पोखरून ही काढू शकतात. त्याचे उत्कट दर्शन या चित्रपटात होते. गावरान भाषेचा लहेजा प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी सांभाळत कथेचा मूळ गाभा रसिकापर्यंत पोहोचवण्यात कलाकार नक्कीच यशस्वी झाले आहेत.
लहान मुल म्हणले की त्याचे निर्विकार बोलणे आणि त्याला जोडून येणारी शब्दामागची भावनांची लकेर प्रत्येक वेळी आपल्याला आकर्षित करते. मग ते फक्त त्याचे खेळणे असो किंवा घरभर फुलपाखरासारखे बागडणे. “आई मला खेळायला जायचे...जाऊ दे ना व...” या संवादातुन स्मार्ट फोन च्या वलयातून बाहेरचे जग खुणावते.
माय लेकराचे नाते अधिक रंगते ते गाईच्या हरवलेल्या वासरामुळे. दावणीला बांधलेले, नुकतेच चालायला शिकलेले वासरू अचानक रानात वाट हरवते; कालांतराने त्याच्या नसण्याने गाईचे खाणे, पिणे, दूध देणे थांबते. दुभत्या गाईची वासराशिवाय झालेली केविलवाणी अवस्था. अचानक त्या वासराच्या मृत्यू ची बातमी येते. पुढे तिचे मृत झालेले पिल्लू समोर तरी कसे आणायचे ही चिंता. प्रेक्षक ही अशा वेळी मिनिटभर स्थब्ध होतात. आजाराने ग्रासलेली आजी चैत्याच्या गावी जाण्याचा आग्रह करते. अचानक कधीही न पाहिलेल्या आपल्या जन्मदात्री आईला पाहण्यासाठीची संधी चैत्या ला मिळते. आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव आपल्या डोळ्यात एकवटून गावी जाण्याचा हट्ट करणारा चैत्या. जणू काही ती दुरवरची आई त्याला बोलवत आहे असे एक क्षण वाटू लागते. बालहट्ट त्या पुढे नियतीचे ही काही चालत नाही. आजीच्या अचानक जाण्याने जमलेल्या मांदियाळीत आपली आई शोधण्यासाठीची धडपड आणि सगळे प्रयत्न करून ही दुरावलेली नाळ जोडण्यास असमर्थ ठरलेली गावाहून आलेली दुसरी आई. ती आल्या पावली परत जाताना काळजावर पडलेले खोलवर वर्ण डोळे ओले करून जातात. चैत्या च्या अल्लड वयात आलेले प्रश्नाचे काहूर. स्वप्नवत भासणारे सारे दृश्य आणि चैत्याला बैचेन झालेले पाहून त्याला हाक देणारी ही माय “चैत्या उठ... चैत्या उठ...” म्हणत ती त्याला उठवते. दूरचा प्रवास स्वप्नातच पूर्ण करून चैत्या अंथरुणातच आईला बिलगतो.
सम्पूर्ण चित्रपटात देवाज्ञा झालेले वासरू गायीला काही दाखवले जात नाही. त्याच जागी पुतळा करून त्या गायीला पुन्हा उभे केले जाते. दुभत्या गाईचे हरवलेले वासरू पुन्हा मिळाले या आनंदातच ती पुन्हा पहिल्यासारखा हंबरडा फोडते आणि चैत्या त्याच्या आईच्या पदराला धरून पहिल्या सारखा घरभर बागडतो. हेच तर हवे असते नात्यातले सुख, ज्यासाठी ही चक्र फिरतात. वादळे येतात. आपले मुलं घरभर शोधून कावरीबावरी झालेली माय, त्याच्या भुकेसाठी मागे मागे धावणारी माय अन हरवलेले वासरू पुन्हा घरी आले म्हणून हुंदके देत रडणारी गाय ...ही नाळ त्यात लपलेल्या सगळ्याच भावनांची आहे. मायेची आणि प्रेमाची आहे आणि ती जोडण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे.
No comments:
Post a Comment