तिथे एक मोठे विस्तीर्ण पसरलेले पिंपळाचे झाड आहे. ज्याच्या चार ही बाजूने एक दगडी चौथरा आहे. त्यावर काही श्रद्धाळू भक्तांनी एक देवीचं छोटसं मंदिर केलं. सुरवातीला एक फोटो पाहिला होता. हळूहळू हार – फुलांची गर्दी झाली. हळदी – कुंकवाने चौथरा सजला. आताशा रोज एक महिला तिथे आस्थेने पूजा करते. आणि दिवा अगरबत्ती करून तिथून जात असे. हे चित्र मी अगदी पाच – सहा वर्षापासून पाहते. रोज न्याहाळते. बरेचदा लाईट जाते. सगळीकडे अंधार पडतो पण तिथे त्या पिंपळाच्या झाडाखाली बरोबर मिणमिणता दिवा असतो. तिथेच शेजारी पूजेचे साहित्य मिळते. अगरबत्ती पासून सगळे साहित्य विकणारे काका तिथे रोज असतात. त्यांची निळ्या रंगाची रिक्षा ही तिकडे दिसणे सवयीचे झाले.
गेल्या चार ते पाच महिन्याच्या कोरोना आणि निसर्ग वादळानंतर बऱ्याच दिवसांनी मी तिथे गेले होते. पूर्वी व्यवस्थित असलेला तो चौथरा पार कोलमडून गेलेला दिसला. त्यावरची फुलं वादळात उडून गेली होती. मंदिर जागचे हलले होते. दिवा कुठे दिसलाच नाही. पिंपळाच्या सुकलेल्या पिवळ्या पानांनी खाली तेवढा गालिचा केला होता. कदाचित रोज दिवा लावणारी ती बाई खूप दिवस इथे फिरकलीच नसावी. गोष्ट इथे संपत नाही. तिथेच एका कोपऱ्यात खुले वाचनालय ही आहे. जे आज एकाचे वस्तीचे ठिकाण म्हणजे राहण्याचे ठिकाण झाले होते. त्या वाचनालयात जुनी काही वर्तमानपत्राची पानं होती. आज एक जण तिथे थांबला होता. त्या वर्तमानपत्राचे “ ताट “ करून त्यात एक वेळचे पोट भरत होता. तर बसण्याचा कडप्पा त्याचा “ सोफा कम बेड “ झाला होता. या चित्रात एका गोष्टीने मनात घर केलं ते म्हणजे एका बाजूला चार पाच मळलेली गाठोडी त्याने ठेवली होती तर त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला एक नारंगी हात रुमाल त्यावर भिंतीचा आधार घेऊन एक जाड जुड पुस्तक ठेवलं होतं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साई बाबांची प्रतिकृती. साईंच्या समोर एक अगरबत्ती आणि त्याच उद्यानातली काही फुलं. तो इसम तिथे नव्हता पण रिक्षातून दुकान सांभाळणाऱ्या काकांच्या कडून घेतलेली ती अगरबत्ती आणि कुंकवाची पुडी तिथे होती. थोडया वेळासाठी वाटले देवाने आपले रूप आणि जागाच बदलली असावी. श्रद्धा आणि त्याचे अस्तित्व मात्र तिथे तसेच अबाधित होते.
No comments:
Post a Comment