Sunday, 18 July 2021

पुन:श्च हरी ओम

     

          एखाद्या नव्या गोष्टीची सुरवात उत्साहात करणे. त्यासाठी हवे ते कष्ट करणे. हा मानवी स्वभाव. सुरवात छान झाली कि मग ती चिरकाल तशीच राहावी ही एकच अपेक्षा मागे उरते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी तरी नवी सुरवात होत असते. उद्याचा दिवस हा ही काहींसाठी नवी सुरवात होतो. मग ती एक छोटीशी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चालते ते चक्र. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास !
हे चक्र मध्ये थांबते, मंदावते, वेगळे होते. पुन्हा जोडले जाते. पुन्हा फिरू लागते आणि वेग येतो. एका क्षणाला भरधाव जाते. अगदी आपल्याला हवे तसे. “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी...लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी...”
या सावता माळींच्या ओळी प्रत्येकाच्या ओठांवर असतात. कोणाच्याही मनात जागा निर्माण करण्याचा एक महत्वाचा रोड मॅप म्हणजे “ जेवण. “
एकदा जिभेवर चव आली की कायम लक्षात राहते. कधी दखल घेतली जाते, कधी कोणाची नव्याने ओळख होऊन जाते. पंगतीत बसल्यावर कधीतरी असा चवदार पदार्थ समोर येतो की “ अन्नपूर्णा सुखी भव: “ शब्द मुखातून सहज येऊन जातात.
तीच ऊर्जा तिथे गुंतलेल्या हाताला, तिच्या कष्टाला मिळते. आणि तिचा ही जीव “ सुखीया “ होतो. हे तंत्र जोवर सुखा-सुखी सुरू असते तोवर घराच्या भिंती जरी ठिसूळ झाल्या तरी ओलसर जमीन सगळे घर बांधून ठेवते.
“ पुन:श्च हरी ओम “ ही तशीच आपल्यातली सामान्यांची असामान्य कथा. कधीतरी आपण ही जगलेली. अनुभवलेली कथा. चित्रपट आणि वास्तव यांना जोडणारी कथा. आपल्या गतीने पुढे जाणारे आपले एक विश्व मध्येच स्पीड ब्रेकरने थांबते. तेव्हा “ पुन:श्च हरी ओम “ म्हणत नवी सुरवात करावी लागते. पहिल्या प्रथम चित्रपट पाहिल्यावर, ऐकल्यावर देवाशी निगडित असावं का असे वाटले. पण जेव्हा कथा पूर्ण झाली तेव्हा काही निवडक प्रसंगातून “ आपला हात जगन्नाथ “ असे काहीसे शेवटी उरले.
खेळीमेळीची कौटुंबिक मध्यमवर्गीन स्थिती त्यात ही सुखाला कमतरता नाही. प्रत्येकाचे वेगळे विश्व तरी बांधलेले. वादविवाद तरी एकमेकांशी पूरक संवाद.
मनीष अंसुरकर यांची त्याच ताकदीची “ नवी सुरवात “ गाण्यात असे काही सांगते, जे ऐकता ऐकता खरंच पुन्हा नव्याने सुरवात करण्याची प्रेरणा मिळते
 “ इवलेसे जगणे, इवलीशी स्वप्ने...इवल्याशा आशेला नभ हे ठेंगणे...स्वप्नांच्या गावी हसत उडावे...घेऊन हातात हात...करू पुन्हा सुरवात नव्याने, करू पुन्हा सुरवात...”
छोटी मोठी स्वप्न आणि ती पूर्ण करताना मिळवलेली, कमावलेली संपत्ती, माणसे आणि बरंच काही. अचानक आलेले वैश्विक संकट त्यात झालेला निसर्गाचा प्रकोप आणि त्यावर सोशल मीडियाचे रामबाण औषध. आजच्या घडीला खर तर सगळेच या रामबाण औषधाच्या प्रभावाखाली आहेत. कोणी गरज म्हणून, कोणी मनोरंजन तर कोणी समाधान शोधत.
काही वेळाने दिपालीचे स्वयंपाक घर आपल्याच घरचे भासते. चूलीवरची चारी दिशांना पसरणारी वाफ आणि जेवणाचा दरवळ आपलासा वाटून जातो. अन्न शिजवणे ते चवदार करणे आणि जगासमोर ती अनन्य साधारण पण महत्वाची गोष्ट माध्यमातून पोहोचवणे, मांडणे, सादर करणे. सामान्यांची ही असामान्य धडपड. शेवटी “ कशासाठी...तर पोटासाठी “ ही या कथेची ओळख होऊन जाते.
सुरवात होते ती महिन्याच्या याद्या आणि गरजावरून. त्यावर आर्थिक टांगत्या तलवारी. नात्यांच्या अपेक्षा. सोन्याच्या किमतीत जमवलेली मदत. वादळात हरवलेली माणसांची घरे, पडक्या कौलाखाली उध्वस्त झालेली आपली चूल, पुन्हा त्याच माणसांसाठी चूल मांडण्याची धडपड.
त्याप्रमाणे सरतेशेवटी पडद्याआड थाटलेल्या चुलीमुळे घरी झालेला संघर्ष आणि त्यावर ही फुंकर देत घरच्यांचा पाठिंबा ही सामान्यांची असामान्य कथा मनाला भावते. अविरत प्रयत्नशील गृहिणी मग ती शहरातली असो किंवा खेड्यातील. जेव्हा उभी राहून वेगळी वाट निवडते. तेव्हा सारा आसमंत “ तथास्तु “ म्हणल्याशिवाय राहत नाही. अशी काहीशी तिची कथा...

8 comments:

Things and Thoughts said...

फार सुंदर लेखन

JUSTICE MUSAFIR said...

मस्तच

Chaitali vibhute said...

खूपच छान लेखन केलय..

जुईली अतितकर said...

Thank you things and thoughts❣️

जुईली अतितकर said...

Thank you so much justice musafir❣️

जुईली अतितकर said...

Thank you chaitali tai❣️

Unknown said...


अप्रतिम

Anonymous said...

खरंय. हा चित्रपट नवीन जगण्याची उमेद देतो एवढेच नव्हे तर त्याही पलीकडे एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात दैनंदिन चाललेला "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" सुद्धा विशद करतो. मग त्यात एखाद्या पुरुषाचा स्वाभिमान, वडिला आणि मुलामधले द्वंद्व, सून हि सून न राहता मुलगी कशी बनते अशा सर्वच गोष्टींचा उहापोह किंबहुना धडाच हा चित्रपट देऊन जातो.

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...