थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या माध्यमातून लोकशास्त्र सावित्री नाटकाच्या टीम सोबत युसूफ मेहेरअली सेंटर, पनवेल येथे जाण्याचा योग आला. मी जेव्हा या सगळ्यांचा भाग झाले, तेव्हा “ लोकशास्त्र सावित्री “ हे नाटक इथे साकारले जात होते. सावित्री इथल्या प्रत्येकात होतीच, आता ती नाटकाच्या रूपात समोर येत होती. ती सावित्री मला पहायला मिळाली.
सायली सोबत मी फोनवर बोलले तेव्हाच मला चैतन्य अभ्यास आणि “ लोकशास्त्र सावित्री “ अनुभवण्याची इच्छा निर्माण झाली. ती आज पूर्णत्वाला येताना तिचा तो पुढाकाराचा हात मला खूप महत्त्वाचा वाटतो. अश्विनी नांदेडकर नाटकातली मुख्य भूमिका करणारी सावित्री. अश्विनी ताईने चैतन्य अभ्यासात सांगितलेल्या गोष्टी विचारांना चालना देत होत्या.
गवतावर डोकं ठेवून आभाळात आपला तारा शोधणे, चंद्र कोरी प्रमाणे हळूहळू वाढत जाणारे आपले चेहऱ्यावरचे स्मित हसू ; पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा सारखे कलाकलाने वाढणारे, अगदी आपल्या वयासारखे. निसर्गाच्या सानिध्यात एक आकृती निर्माण करणे ते ही अगदी नैसर्गिक; कृत्रिम काहीच नाही. मग ते फुल असेल, फुलपाखरू असेल, रंगीत पक्षी, उगवणारा चंद्र, तिथे हे सगळं सुचणं अगदी स्वाभाविक होते. ते सौंदयपूर्ण ही भासत होते. ताईने सांगितलेला उगवण्याचा कन्सेप्ट. एक प्रेक्षक म्हणून या गोष्टीकडे पाहण्याचा कसा दृष्टिकोन असू शकतो? आणि एक लेखक किंवा एक कलाकार म्हणून आपल्याला काय पोहोचवायचे आहे? हा लेखक आणि प्रेक्षक यातला पूल किती भक्कम असावा लागतो ? हे इथे समजले. परीची निरागसता आणि तिच्या मनातलं कुतूहल, कोमलची कठोर मेहनत, प्रियांका, सुरेखा, प्रथमा, तुषार, तनिष्का, आईचं प्रेम आणि माया सगळं सगळं नवी ऊर्जा देणारे होते.
चंद्राच्या शीत प्रकाशात टेकडीवरून खाली येताना समोर अंधार होता पण मागे पुढे वाट दाखवणारे वाटाडे होते. तो चंद्राचा वाटेवर पडणारा शीत प्रकाश पुढे जाण्यासाठी इतकंच काय ते पुरेसं होतं. ही स्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा न केव्हा येतच असते. तेव्हा तो चंद्र प्रकाश पुरेसा असतो आणि सहप्रवासी जे आपल्याच वाटेने पुढे पुढे जात असतात. त्या दिवसासाठीची ही एक आठवण आपल्याला रोजच्या जगण्यात पण किती पटकन जवळची वाटते. हेच तर हवं असतं असं तेव्हा वाटून जातं. जे मला इथे अनुभवायला मिळालं.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगी विचार घेऊन दिवसाची सुरुवात झाली. रंगाचं आणि सृष्टीचं अस एक कालातीत नातं आहे. रंगाना आपल्यात सामावून घेत या सृष्टीचे सृजन करण्याची ताकद निसर्गात आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशा पाच तत्वांनी सजलेल्या या सृष्टीचा आपण ही एक अंश आहोत. कमी अधिक प्रमाणात आपल्यात ही यातली एक ( सुपर पॉवर ) शक्ती पुरेपूर भरलेली आहे. कोणी अग्नी सारखे तेजस्वी, प्रखर, उष्ण. तर कोणी वाऱ्याप्रमाणे वेगवान. कोणी पाण्यासारखे प्रवाही. कोणी भूमीप्रमाणे मुळांना धरून ठेवणारे, कठोर. कोणी आकाशासम विशाल. आपल्यातली शक्ती ओळखण्याची समज म्हणजेच स्वतःची स्वतःशी झालेली ओळख. मानवी स्वभावात अशी मूल्ये येतात तरी कुठून... निसर्गातून. माझे उत्तर मला तेव्हा या संवादातून मिळाले. स्वतः कडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाला. प्रत्येकात या पंचतत्वापैकी एक एक तत्व रुजत गेले. त्या तत्वाच्या शोधाला इटरनल स्किल असे तेव्हा म्हणले.
कलाकाराची प्रतिभा किती खोलवर रुजलेली असावी लागते आणि ते भाव चेहऱ्यावर येण्यासाठी आपल्यातील माणसाला कसे जागे करावे ? हे पुढच्याच नाट्यात अनुभवता आले. लोकशास्त्र सावित्री या नाटकातील एक प्रसंग. तीन जणी एका वर्तुळात उभ्या होत्या. तिथे सीतेची अग्निपरीक्षा दाखवली जात होती.
या आणि अशा मानवतावादी प्रश्नाना दृश्य रूपात मांडले गेले. पुढची दोन ते अडीच तासाची नाट्य कलाकृती पाहताना बदलाची सकारात्मक ऊर्जा मिळाली. आपल्या समोरून जाणारी दृश्य अजिबात कुठे मिस होऊ नये हीच एक इच्छा होती. “ हम है... “ या घोषणातून तालमीचा आणि दिवसाचा समारोप झाला.
18 comments:
खूप सुंदर लिहले
खूप सुंदर♥️
Thank you pragati
Thank you ✍️
अप्रतीम जुई...❤️👌👌
धन्यवाद ❣️
Mind Blowing.....Supperbly written
Thank you ✍️
नितांत सुंदर
Thank you bhavesh ✍️
फारच सुंदर आणि जीवंत अनुभुती मिळाली तुला...लोकशास्त्र स्वाती पाहिल्यानंतर नकळत आपण आपल्यात आपल्यालाच शोधत जातो, चंद्र प्रकाशात फिरणारी अवखळ जुई, गवतावर डोकं टेकवून चंद्राशी गप्पा मारणारी वेडी जुई, चंद्रकलेसोबत स्मित फुलणारी कळीसारखी जुई, आणि हे सगळं असूनही प्रगल्भपणे आमच्या ळीसमोर मांडणारी लेखिका जुई, तिच्यातल्या कवियत्री समृद्ध करणारी जुई ही सग सगळी "लोकशास्त्र सावित्रीतल्या " तर छटा आहेत...
जुई, पहिल्यांदाच मी मला देखील तुझ्या शब्दांत कुठंतरी जाणवले...
फारच सुंदर ❤
फार छान अनुभव ...😊
वाह जुई.. फारच सुंदर
छान.
आपल्यातला " स्व " शोधता शोधता, त्या नाट्यातून, नकळत त्या संघाशी तू एकरूप झालीस, सामावून गेलीस आणि त्यांची ऊर्जा, आंतरिक सौंदर्य तुला मिळून तीच ऊर्जा तू स्तुत्य शब्दरूपात त्या संघाला परत प्रदान केलीस. हेच तर आत्मा परमात्म्याचे मिलन, इथे आत्मा म्हणजे कलाकार तर परमात्मा म्हणजे कला.- आशिष
वाह ... अचूक निरीक्षण ✍️🙏
Thanks 😊
धन्यवाद ❣️
Nicely articulated Jui. The meaning and feeling for this article are too deep. Keep writing such wonderful blog articles.
Yes...Thank you so much ✍️
Post a Comment