इतिहासातल्या वाटा आकाशाला भिडणाऱ्या बुरुजाच्या, भक्कम तटबंदीच्या, गड किल्ल्यांच्या, राजे महाराजांच्या, वाडा वसाहतीच्या, दगड मातीतल्या क्रांतिकारकांच्या असतात.
इतिहासातले एक पाने पुन्हा उघडण्यासाठी, बंद दारामागे असलेला इतिहास पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी, निर्जीव भासणाऱ्या भिंतींना पराक्रमी योध्याचे पोवाडे ऐकवून जिवंत करण्यासाठी इतिहासातल्या वाटा शोधत काही जण येतात. त्या मातीत रुजलेला बलिदानाचा अंकुर मोठा करत प्रवास पुढे नेतात.
पनवेल या शहराला मिळालेला ऐतिहासिक वारसा. स्वातंत्र्य लढ्यात असामान्य योगदान देणारा योद्धा, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी दिलेली भेट आणि तिथला हा अनुभव. तिथल्या इतिहासातल्या वाटा शोधण्यासाठीचा प्रवास...
३१, मार्च २०२४, पनवेल जवळ शिरढोण या ठिकाणी कवी कट्टा आयोजित करण्यात आला. को म सा प युवाशक्ती मुंबई, रायगड, ठाणे वेगवेगळया ठिकाणावरून या कट्ट्यासाठी कवी, कवयित्री आणि साहित्यिकांनी हजेरी लावली होती. कट्ट्याचे ठिकाण हे ऐतिहासिक वेगळेपण घेऊन आले होते. ज्या मातीत क्रांतिकारकांचे वास्तव्य होते अशा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी हा कट्टा संपन्न झाला आणि त्याला एक झुंझार, शौर्याचे रूप आले.
प्रवासाला निघालो. शिरढोण गावाच्या वेशीवरच त्यांच्या नावाने लिहिलेली कमान दिसली. पलीकडच्या गावाचा ती इतिहास सांगत होती. स्वातंत्र्याची लढाई आणि झुंझार योध्याचे गाव. शेजारीच शहर असून ही आपले गावपण जपणारं, वाडा आणि कौलारू घरांची वस्ती असलेलं ते गाव कमानीच्या पलीकडे होतं. आम्ही फडके वाडा पाहिला. त्याची डागडुजी सुरू होती. आत गेल्यावर त्यातली भव्यता अनुभवता आली. तिथल्या खिडकी दरवाजांवर, भिंतीवर नवा साज चढलेला होता. नवा रंग चढलेला होता. ऐतिहासीक वास्तू नव्याने उभी राहताना वाड्याचे दार आमचे स्वागत करत होते. वाड्यात प्रवेश केल्या केल्या अंगणात तुळस सांभाळणारे त्या काळचे दगडी तुळशी वृंदावन पाहायला मिळाले. कोरीव काम केलेले ते तुळशी वृंदावन वाड्याचे पावित्र्य जपत होते. त्याच्या समोर एक शिव पिंड, एक मिणमिणता दिवा ठेवलेला होता. जवळ आल्या आल्या आपसूक हात जोडले गेले. तिथले सागवानी महाद्वार आणि वाड्याच्या समोरच बहरलेला चाफा तिथल्या सजीव अस्तित्वाचे दाखले देत होता. तिथल्या विहिरी, त्यातलं पाणी, त्यांची हत्यारे, अवजारे, रोजच्या वापरातल्या वस्तू आणि क्रांतिकारकाच्या आठवणी स्मृतीत जपले गेले.
तिथल्या भव्य दालनातून डोकावणारा क्रांतीचा संघर्ष स्फूरण घेऊन आला होता. आजही बऱ्याच ठिकाणी असा एक क्रांतिकारक पोहोचण्याची वाट हे जग पाहत आहे पण एक आशावादी चित्र तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या सादरीकरणात दिसत होते.
फडकेंचा इतिहास सांगणारे तिथले संग्रहालय कित्येकांसाठी इतिहासाची पाने पुन्हा उघडून देत होते. अचानक आलेली ही दर्दीची गर्दी, वेडे कलाकार आणि साहित्यिक, त्यांचा उत्साह पाहून ते ही आनंदून गेले होते.
तिथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे क्रांतिकारकांच्या प्रति कौतुक, जाणून घेण्याची उत्सुकता, कृतन्यता, बदलाची इच्छा आणि युवा सहभाग असे आशावादी चित्र पाहून कुठे तरी क्रांतीवीर ही खुश झाले असतील.
वाडा पाहून झाल्यावर वाड्याच्या बाहेर असलेल्या दगडी पायऱ्यांवर थोडा वेळ बसलो. तेव्हा भविष्याचे स्वप्न रंगवणारे माझे मन पाठीशी असणाऱ्या दरवाजातून कधी आत गेले आणि इतिहासाच्या वाटा चालू लागले कळत ही नाही. बराच वेळ तिथेच रमून गेले.
कट्ट्यासाठी केलेले नियोजन, त्यात ही अनेकांनी स्वेच्छेने घेतलेला सहभाग, तिथल्या नियोजनात मदत करणाऱ्या कानिटकर काकू. सकाळ सकाळी कल्याणच्या खिडकी वडापावची न्याहरी आणणारे दातार काका, दुपारी जेवणानंतर मुरुडच्या खाजाची गोड आठवण सोबत घेऊन आलेला कवी गझलकार सिद्धेश दादा, या कट्ट्यासाठी प्रोत्साहन देणारे, मदतीला पुढे येणारे मित्र मंडळ त्यात पार्थ तसेच प्रथमेश, विश्वासाने आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या, अनुभवाची शिदोरी आम्हा युवासाठी रीती करणाऱ्या प्रा.दीपा ठाणेकर मॅडम, सूत्रसंचालनातून कवितेच्या ओळींची, शब्दांची सोनेरी झालर देणारे हेमंत बारटक्के सर. जेष्ठ साहित्यिक, नेते, समाजसेवक एल बी पाटील सर उपस्थित होते. या सर्व गोष्टी आमलात आणताना चाफ्याच्या फुलांनी कट्ट्याला लावलेली हजेरी आणि त्यामुळे सुगंधाने दरवळणारी ही मैफिल, सारेच एकमेकांत समरसून गेले आणि या कट्ट्याला वेगळेपण आले. कट्टा यशस्वी झाला. पुन्हा भेटू या भावनेने सर्व परतीच्या मार्गाला लागले. आम्ही ही निघालो, आलेल्या रसिक मित्र मैत्रिणींसोबत पाटील काकांच्या रिक्षातून आम्ही पनवेल पर्यन्त पोहोचलो. येताना मात्र बहरलेला चाफ्याचा सुगंध, तुळशीचे वृंदावनाचे हिरवेपण आणि क्रांतिवीरांच्या आठवणी घेऊन आम्ही माघारी आलो.
No comments:
Post a Comment