ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर दिला. परीक्षा संपून बरेच दिवस झाले होते. दूरचा प्रवास करायचे मनात ठरवले आणि मावशीकडे जाण्याचा बेत आखला. पुढच्याच आठवड्यात पनवेल एस टी स्टॅण्ड गाठले. पहिला वहिला एकटीने एस टी चा प्रवास. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर एस. टी पुढे येऊन उभी राहिली. खिडकीची जागा पकडली आणि पुढच्या पाच सहा तासासाठी तिथेच सेटल झाले. आई मनावर दगड ठेवून मला सोडण्यासाठी आली होती. आपले मुलं दूर जाताना आईच्या मनावर अदृश्य दगड असतोच. ते तिच्या नजरेतून मी ओळखलं होतं. काहीही झाले तरी आता माघार नाही ठरलं होतं. खिडकीतुनच मी सुखरूप लवकरात लवकर परत येण्याचा आशावाद दिला आणि अचानक एस टी जागची हलली. काही क्षणासाठी मन दाटून आलं. काही क्षणात एस टी निघालीच. हळूहळू दूर जात होते. मनात हुरहूर वाढत होती पण सोबत उत्साह ही होताच. नवीन अनुभव घेऊन मी परत येणार होते.
कोल्हापूर ... लाल मातीतल्या गड्यांचं, कुस्तीतल्या पैलवानांच, मराठमोळ्या शाहूंचं कोल्हापूर, कोल्हापूर ठसक्यातली मिरची, तांबडा पांढरा रस्सा, मिसळीच कोल्हापूर ...माझ्या मावशीच कोल्हापूर !
प्रवास चालूच होता. म्हणता म्हणता दोन तीन तास उलटले. पनवेल आणि माझं घर कुठच्या कुठे राहील होतं. नागमोडी वळणावरून, बोगद्यातून गाडी धावत होती. सुमधुर गाणी, आजू बाजूला हिरवाई अंथरलेली, उसाची शेत आणि थंडगार वारा सगळ्यांनी ताल धरला होता आणि वातावरणातील सौंदर्य वाढवणारे ते सगळेच मनाला शांती आणि समाधान देत होते. रस्ता मागे जात होता. गाडी पुढे जात होती. जणू काही मागच्या सगळ्या कडू गोड आठवणी मागे टाकून येणाऱ्या नव्या आठवणी मला साद घालत होत्या. प्रवासाची खरी गम्मत तेव्हा येते जेव्हा नवे अनुभव येतात. मी पुढच्याच सीट वर होते. प्रवासाचा काही अंदाज नव्हता त्यामुळे माझ्या शेजारच्या सीट वर बसलेल्या व्यक्तीला आपण कुठं पर्यंत आलोय आणखी किती वेळ लागेल विचारलं. तेव्हा त्याने फोन मध्ये पाहून अचूक माहिती दिली. त्याच्याकडे असणाऱ्या स्मार्ट फोन मधले गुगल मॅप मी तेव्हाच पाहिले.
मागच्या सीटवर बसलेले वृद्ध आजोबा सुद्धा ते कौतुकाने पाहत होते. त्यांनी ही मग विचारपूस केली. तोंड ओळख झाली आणि नंतर ते ही कोल्हापूरलाच निघाले कळलं. मुंबईहून सुट्टीसाठी ते आपल्या नातवंडांना भेटायला निघाले होते. त्यांच्या बोलण्यातला उत्साह भरभरून जगण्याची इच्छा आणखी प्रबळ करत होता, सोबत आनंद होताच. त्यांच्या बोलण्यातून तो जाणवत होता. मुलावरचा, सुनेवरचा अभिमान, नातवंडावरच प्रेम आणि जगण्याचं समाधान ही दिसत होतं. बघता बघता गाडी कोल्हापुरात शिरली आणि वेळ कसा गेला कळलं नाही. माझी त्या आजोबांशी थोड्याच वेळात चांगली गट्टी जमली होती. कोल्हापूरचा सगळा इतिहास, भूगोल सार काही त्यांनी मला दोन तासात सांगितले होते. जाताना त्यांनी मला त्यांचा कोल्हापूरचा घरचा पत्ता ही दिला, घरी माझ्या नातवंडाना भेटायला यायला सांगितले असे आपुलकीचे बोलवणे आले आणि विश्वास म्हणजे काय ? हे कळलं.
फायनली गाडी थांबली. कोल्हापूर एस टी स्टॅण्ड आलं. गाडीतून उतरल्यावर त्यांनी माझा निरोप घेतला. मी काकांची वाट बघत पाच दहा मिनिटे तिथे उभी होते. बघता बघता काका आले आणि मी माझ्या सामानासकट तीन कलिंगड घेऊन मावशीकडे पुढच्या दहा मिनिटात पोहोचले.
No comments:
Post a Comment