Friday, 24 July 2020

ती स्मरणीय भेट

        वेळ संध्याकाळची, कोणतंही आधीच आखीव रेखीव नियोजन नसताना योगा- योगाने म्हणा, नाहीतर नियतीने मला तो एक दिवस तिथल्या मुलांसोबत, आजी आजोबांसोबत घालवायला मिळाला. ही संधी मिळाली ते साहित्य संपदा संस्थेचे प्रमुख श्री वैभव धनावडे यांच्या पुढाकाराने. औचित्य होते वाढदिवसाचे. खरं तर वाढदिवस किंवा वर्षपूर्तीची जंगी पार्टी जिगरी दोस्तासोबत आपण करतोच, पण आपल्यात असे अनेक दुर्लक्षित झालेले किंवा अजाणतेपणी केले गेलेले अनेक मित्र मैत्रिणी असतात. त्यांच्या सोबत आपल्या आयुष्यात आलेले हे महत्वाचे दिवस साजरे करणं हे ही आनंद देऊन जातं याची जाणीव तेव्हा घरी परतत असताना झाली. मनोमन त्या पालक वजा मुलांच्या आणि आजी आजोबांच्या डोळ्यात पाहिलेले भावनिक उमाळे आणि आपल्यापेक्षा वयाने लहानाची मोठी स्वप्ननगरी पाहून आनंद म्हणजे नक्की काय ? आणि कुठे कुठे शोधायचं हे ही कळलं.
ती जागा होती पनवेल जवळचे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम. तिथे दोन विश्व एकत्र नांदत होती. एका ठिकाणी लहान मुले ज्यांना नव्याने जग पाहायचे होते. स्वतः ला आजमावायचे होते. कोऱ्या मनाच्या पाटीवर, ज्यांना स्वतः ला आयुष्याचे गणित सोडवायचे होते. अडनिड्या वयातली तर काही बोबडे बोल बोलणारी अशी सगळी मुलं होती, ती बरोबर की चूक हे ठरवणारे दिशादर्शक किंवा वाटाडे ही कदाचित त्यांना शोधावे लागणार होते. अशी कोवळी अंकुरलेली मने आणि त्याची ती लहानशी वस्ती तर एकीकडे आपलं सगळं विश्व पाहून, रमून, जगून आणि मागे टाकून पुढे आलेली वयोवृद्ध आजी आजोबांची वस्ती.
त्यात ही फुलाप्रमाणे फुलणारी त्यांची मैत्री इंधन म्हणून जगण्यासाठी होती. आपण कधी दूर दूर आनंद शोधत भटकत असतो, पण ही मंडळी आपल्याला आनंदात जगायची कला शिकवतात. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा तो ही आपली ओळख व्हावा असे जगण्यात जो आनंद आहे तो किती सहज आपल्याला मिळू शकतो हे मला तिथे जाणवले. आम्ही निघताना ही ती मुलं आमचे आभार मानत होती. " परत या " हे आग्रहाचे बोलवणे ही कानावर पडले. कदाचित त्यावेळी जगण्याची कला शिकवल्या बद्दल त्यांचेच आभार मानावे वाटले. आपण भावनिक आणि सामाजिक बाजूने किती श्रीमंत होऊ शकतो हे त्यांनीच शिकवले.
 " इतनी शक्ती हमे दे न दाता...मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना..." ही शाळेत म्हणली जाणारी प्रार्थना तिथे म्हणली आणि आम्ही निघालो. जाताना ज्याचा शोध सुरु होता तो आनंद त्यांच्या आणि आमच्याही चेहऱ्यावर होता.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...