Thursday, 30 July 2020

पेन्शन प्लॅन


   
आपल्या जीवनचक्रात उतार वय हे एक नात्याच्या बहारदार वृक्षाला आलेले सुंदर फुल आहे. त्यात दडलेलं एक खोडकर मुलं आहे. कधी त्यात काळजीची चाहूल आहे तर कधी त्यात मायेची भूक भागवणारी चूल आहे.वयाच्या या टप्प्यावर आता थोडी शांतता ही आवडते. थोडी गडबड ही होते. थोडा आराम ही हवासा वाटतो तर कधी लहानासोबत खेळताना उत्साह ही येतो. या वेळी फक्त नात्याची गुंफण सोबत हवी. त्यात लकेर थोडी नवी, रुसवा फुगवा, गप्पा गोष्टी आणि अनुभवांची शिदोरी हवी. फुललेल्या या वृक्षाला आलेला बहर पाहणं हेच आजवरच्या जीवनाचं फलीत. तर याचा आस्वाद याची देही याची डोळा घेणं, दुसरे बालपण म्हणजे वृद्धत्व. शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सातपुते आजी आजोबा एकदा मला रस्त्यात भेटले. बरेच दा मी त्यांना वेगवेगळे बाहेर जाताना भेटले पण आज बऱ्याच दिवसांनी दोघे एकत्र समोरून येत होते. त्यांच्याशी बोलताना माझे आजी आजोबा आठवले. माझे बालपण समोर दिसू लागले. आम्ही सगळे नातवंड सुट्टीत गावी भेटायचो. खुप फिरायचो. अंगणात तासन तास खेळत बसायचो. अंगणात मस्त वारा सुटलेला असायचा आणि त्यात बैठक मांडून वाऱ्याच्या वेगातच आमचा खेळ रंगत असे. आजोबा आम्हाला त्याच्या शिक्षकी कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी सांगत. बरेचदा त्याच्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांचे त्यांना कसे अनुभव आले ? त्यांच्या या कार्यात किती कठीण परिश्रम होते हे आम्हाला सांगत. त्यात त्यांच्या दयाळू आणि कनवाळू स्वभावामुळे त्यांना कसे फायदे किंवा नुकसान झाले यावर आजी सुद्धा कितीदा चर्चा सत्र भरवत असे. विचारांची शृंखला सुरु झाली. तेव्हा आजोबांनी सांगितलेले एक वाक्य आठवले. आपले गेलेले दिवस आपल्याला परत मिळत नाही. कधी कधी आपली माणस ही आपल्याला परत मिळत नाही पण तेव्हाच्या आठवणी आणि त्यासोबत मिळालेले काही अनमोल क्षण आयुष्यभरासाठी पुरेसे असतात. कधी तरी आपली थांबलेली गाडी पुढे नेण्यासाठी तेव्हा ते इंधन म्हणून काम करतात. जग इकडचे तिकडे झाले तरी आपली मूठ अजूनही बांधलेली आहे, यात कुठेही सैल पडलेली दोर नाही की अविश्वासाचा मागमूस नाही म्हणून त्यांची गाडी एकत्र पुढे पुढे जात असते. आपल्या रस्त्यावर आपला मार्ग दाखवणारा कोणीतरी आपल्या सोबत असतो आणि आजवर चाललेल्या रस्त्यावर आलेले अडसर दूर करून आज पुन्हा रि-युनाइट होण्याची संधी देतो. हा प्रवास किती काळ पुढे शिल्लक आहे हे खर तर तेव्हा कोणालाच माहीत नसत. पण तेव्हा सोबत कोण कोण करणार हे आपले आधीचे आयुष्य ठरवते. कदाचित म्हणून उतार वयाला पेन्शन प्लॅन आपण म्हणूच शकतो. आपली आयुष्याची जमापुंजी म्हणजे हे दिवस...ख्याली खुशाली विचारून आजी आजोबा पुढे निघाले आणि मी हि माझ्या वाटेल लागले.  

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...