पावसाची चाहूल लागली की पक्षी आपलं लहानसं घरटं बांधतात. सळसळत्या वाऱ्यापासून आपलं घरटं आणि आपली पिल्लं सुखरूप राहण्यासाठी झाडाच्या कुठल्यातरी उंच कोपऱ्यावर दोन फांद्यांच्या आधारावर ते एक एक काडी एकत्र करून आपलं छोटंसं विश्व उभं करतात. झुलणाऱ्या पानांची सावली आणि त्यावर लगडलेली जांभळं त्या घरट्याची आणखीनच शोभा वाढवतात. अस हे झाडात लपलेलं आणि पानांनी सजलेलं घरटं माझ्या अगदी डोळ्यासमोर बांधताना मी पाहत होते. माझ्या घरासमोर असलेल्या जांभळाच्या झाडावर बांधलेलं ते घरटं, संध्याकाळी त्यातून येणारा पिल्लाचा आवाज लक्ष वेधून घेत असे.
त्या घरट्याकडे बघून मला वाटायचे, इथे फक्त माणसाची परीक्षा घेतली जात नाही. जशी आपली परीक्षा होते. तशीच या कुठून कुठून गवताच्या काड्या उचलून आणणाऱ्या पक्षाची पण होत असते. बरेचदा अचानक जोरदार वारा आला की त्या फांदी सकट ते घरटं हलायचं. त्यावेळी तो पक्षी उडून जायचा पण परत आल्यावर ते घरटं तिथे नसलं तर याची भीती त्याला नसेल का ? असा प्रश्न पडायचा.
दर दोन तासांनी तर ते आपल्या पिल्लांना आपल्या चोचीने भरवायचे. अजून त्यांना पंख ही फुटले नव्हते. त्यांच्या चिमुकल्या चोचीत बळ ही नव्हते आणि पंखांना अजून ही आधाराची गरज होती अशा वेळी अचानक आलेला वारा त्याची परीक्षाच पाहत होता.
पडलं तर झेलणार कोण ही भीती जशी त्या पक्षांना असते तशीच ती आपल्यात ही असते. अपयश येणं, निराशा येणं हे त्या वाऱ्या सारखंच आहे. फक्त फांद्यांच्या जागी इथे आपलं घर आणि कुटुंब असत, नाही का ….
" एक मन मे है विश्वास " विश्वास नागरे पाटील यांचे नुकतेच वाचण्यात आलेले हे पुस्तक आणि त्यातली वाचण्यात आलेली कथा मला या आठवणीत जपून ठेवायची आहे म्हणून हे आठवणीतले पान…
एक राजा आपले दोन गरूड एका माणसाला सोपवतो आणि त्यांना उडायला शिकवायला सांगतो. राजा दोन्ही गरुड एक दोन आठवड्याने पाहायला येतो. राजाला एक गरुड उडताना दिसते तर दुसरे फांदीवर बसलेले असते. राजा त्या माणसाला सांगतो हे असे बरोबर नाही. तो गरुड आहे त्याचा स्वभाव उंच आकाशात उडण्याचा आहे तो असा फांदीवर बसून कसा चालेल ? राजा सगळीकडे राज्यात घोषणा करतो आणि त्या गरूडाला उडायला शिकवणारा कोणी असेल तर पुढे या म्हणतो. एक गरीब शेतकरी त्याला भेटतो आणि तो गरुडाची जबाबदारी घेतो. दोन दिवसातच राजाला त्याच्या बागेत तो गरुड उडताना दिसतो. हा चमत्कार कसा झाला हे विचारल्यावर तो शेतकरी सांगतो " तो ज्या फांदीवर बसायचा मी ती फांदी तो त्या फांदीवर बसल्या असताना कापून टाकली. सुरवातीला पंखांची फडफड केली. आता तो दुसऱ्या गरुडापेक्षा ही उंच उडायला लागला आहे. पडायची भीती असली तरी त्याच्या पलीकडे गेलं कि धाडस येते आणि मग आकाश आपले होऊन गेलं कि त्याला उंच उडता येतं हेच यावरून कळत. हे पाण्यात पडल्यावर पोहता येत याच्या सारखंच नाही का. याठिकाणी त्या शेतकऱ्याने तीच भूमिका घेतली.
आपल्या फांद्या आपलंच कुटुंब कधीच तोडू शकत नाही. त्यासाठी बाहेरच विश्व असतं. आपल्याला तेव्हा ते ओळखता आलं पाहिजे. जे हवं ते शोधून मिळवता आलं पाहिजे. पडता पडता सावरता आलं पाहिजे. अशीच आणखी एक गोष्ट त्याच पुस्तकात वाचलेली. असंच गरुडाचे उदाहरण आहे. उदाहरण भव्य असलं की आपोआप आपली स्वप्नाची उंची ही वाढते. गरुड आपल्या पिल्लांसाठी जेवण शोधत असते. तेव्हा त्याची पिल्लं माणसाचं मांस पाहिजे म्हणून हट्ट करतात. सुरवातीला ते गरुड मेलेल्या बोकडाचे मांस आणते तर दुसऱ्या वेळी गाईचे मांस आणते. पिल्लं लहान आहेत त्यामुळे त्यांना कळणार नाही हा त्याचा गैरसमज असतो.पण पिल्लं ते शिवत ही नाहीत. उपाशीच राहतात. शेवटी न राहवून तो मिळालेलं गाईचं मांस मंदिरासमोर आणि बोकडाच मांस मशिदीसमोर टाकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं मशिदीच्या आणि मंदिराच्या आवारात राहणारे लोक पाहतात आणि यामुळे समोरा समोर असलेल्या त्या मंदिराचे लोक आणि मशिदीतले लोक संशयास्पद वाटल्यामुळे एकमेकांचा जीव घेतात. या प्रकारात बरेच नाहक बळी जातात याचा फायदा गरुड घेते आणि आपल्या पिल्लासाठी जेवण घेऊन जाते. वरील दोन्ही उदाहरणे आपल्याला हेच सांगतात.
गरुड त्याच्या जागी बरोबरच होते. फक्त तेव्हा परिस्थितीनुसार त्या मंदिरातल्या लोकांना बदलता आले नाही आणि त्याचा फायदा गरूडाला झाला. आपण एखादी गोष्ट करताना आपल्या आजूबाजूला असे बरेच गरुड घिरट्या घालत असतात. त्यांना दूरदृष्टी असते. आपल्यात ती आली तर आपण त्यातून काहीतरी शिकू शकतो. स्वतः ला वाचवू शकतो. उंच भरारी घेणारा एक गरुड आपण ही व्हावं हा आत्मविश्वास आपल्याकडे असेल तर आपली पिल्लं कधीच उपाशी राहणार नाही. चिवचिवाट वाढला आणि वारा माझ्या विचारांना शिवून गेला. निःशब्द करून गेला.
No comments:
Post a Comment