शेवटचा गणिताचा तास होता. वर्गात खूप गोंधळ सुरू होता. त्यात गणिताची आकडेमोड घेणे म्हणजे आणखी मोठे युद्ध. शेवटी एक गमतीशीर गोष्ट सांगितली. मी शाळेत असताना एकदा अशीच एका तासाला माझ्या शिक्षकांकडून ऐकली होती. गोष्ट अगदीच लहान होती पण त्यावर मुलांकडून मिळालेली उत्तरं त्याहून मजेशीर होती.
एका गावात एक सुधीर नावाचा मुलगा राहायचा. त्याच्या घरची स्वतः ची उसाची शेती होती. थोडा ऊस व्यवसायासाठी ठेवून, उरलेला गूळ बनवण्याच्या कामात वापरला जायचा. लहानपणापासूनच गोडाची आणि गोड पदार्थाची सुधीरला आवड होती. ताजा केलेला गूळ लहानपणी त्याची आई त्याला चाखायला द्यायची. बघता बघता याची त्याला सवय लागली. आणि प्रत्येक वेळी जेवणात, नाश्त्याला नाहीतर असाच तो गूळ खाऊ लागला. त्याच्या या सवयीमुळे त्याच्या सोबत घरच्यांना ही याचे परिणाम दिसायला लागले. एखादा दिवस गूळ नसेल तर सुधीर सैरभैर व्हायचा. गोंधळ करायचा.
बारा तेरा वर्षाचा सुधीर गुळासाठी एवढा हट्ट करतोय हे पाहून आई बैचेन व्हायची. न राहवून तिने तिच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या मैत्रीणीला याबद्दल सांगितले. त्या बाईने कुठल्याशा मठाचा पत्ता दिला आणि तिथे जाऊन सुधीर बद्दल सांग म्हणाली. दुसऱ्या दिवशी सुधीरला घेऊन ती मठात गेली. तिथे डेरेदार वृक्षाखाली बसलेले महात्मे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान बुद्ध होते. ज्याची कीर्ती तेव्हा दूर दूर पसरली होती. दुसऱ्याच दिवशी ती सुधीरला घेऊन तिथे गेली. मठ किंवा भव्यदिव्य मंदिर असे काहीच दिसले नाही. लहानशी झोपडी होती. एका बहरलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना शिकवत होते. काय सुरू आहे ते पाहण्यासाठी सुधीर तिथे गेला. बुद्धानी त्याला ही तिथे सोबत बसायला सांगितले. मुलाची शाळा संपली. सुधीर सगळीकडे न्याहाळत होता, तेव्हा त्याची आई समोर आली आणि सुधीरच्या हट्टी स्वभावांविषयी आणि गूळ खाण्याच्या सवयी विषयी सांगू लागली. तिचा काळजीपोटी अस्वस्थ झालेला चेहरा भगवान बुद्धांनी वाचला. सुधीरला जवळ बोलवले आणि एकदा निरखून पाहिले. काही तरी दैवी शक्ती असावी या आशेने त्याच्या आईने त्यांच्याकडे पाहिले. सुधीरला ते बरे करतील अशी आईला अपेक्षा होती. म्हणून ती ही शांत उभी होती. सुधीरच्या खिशात हात घातला तरी त्यातून गुळाचे तुकडे मिळाले. भगवान बुद्धांनी त्यांना आठवड्याने यायला सांगितले. बरोबर एक आठवड्याने पुन्हा सुधीर आपल्या आईसोबत पुन्हा आला. तेव्हा कुतूहलाने आईने विचारले " एवढा वेळ घेतला म्हणजे नक्की जालीम औषध असणार " भगवान बुद्ध म्हणाले. " औषध माझ्याकडे नाही तुमच्याकडेच आहे, एक आठवड्याचा वेळ तर मी माझ्यासाठी घेतला. इथे आम्ही जे पक्वान्न बनवतो त्यात ही बरेचदा गुळ वापरतो. मला ही गूळ खायला आवडतो. मग जर मलाच त्या गोष्टीची आवड असेल , सवय असेल तर मी कसे बर याला सांगणार, नको खाऊस म्हणून."
" जेव्हा समोरची व्यक्ती आपण करतो तशीच कृती करते तेव्हा ते चूक आहे हे सांगणं बरोबर आहे का ? " त्याच बरोबर तुम्ही लहानपणी दिलेली गुळाची वडी आज त्याची सवय झाली याला फक्त तो एकटाच जबाबदार आहे का ? सुधीरच्या आईचा गंभीर झालेला चेहरा पाहून बुद्ध पुढे म्हणाले " जर गुळाची गोडी त्याला तुम्ही लावू शकता तर दुसऱ्या कशाची का नाही? "
" एकदा आपले स्वतःचे परीक्षण केले की झालं. तेच स्वभावावरचे जालीम औषध." गोष्ट इथेच संपली. नेहमी प्रमाणे काय शिकलो या प्रश्नावर मुलांकडुन उत्तर आले. " गुळाच्या ऐवजी जेवणात साखर वापरावी ! " पुन्हा एकदा सगळ्यांचे हसरे चेहरे झाले. मी त्यांना त्या गोष्टीचे तात्पर्य सांगितले. " एखादा बदल तुम्हाला समोरच्या मध्ये घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतः पासून करा. जग आपोआप बदलेल. आणि असे नाहीच झाले तरी ही स्वतः मध्ये तो बदल केल्याने ते कोणाला अशक्य वाटणार नाही. " तास संपला. शाळा सुटली. वर्गातून निघताना मानसने त्याचीही अशी साखर खाण्याची वाईट सवय आहे हे स्वतः समोर येऊन सांगितले आणि त्या सुधीर प्रमाणे त्याला ही घरी आई ओरडते. पण त्यासाठी आता तो कुणाकडे जाणार नाही. कारण त्याचा उपाय त्याच्याच कडे आहे. असं तो मला जाता जाता सांगून गेला. त्याची पाठमोरी आकृती पाहून आजचा तास नेहमीप्रमाणे नवे शिकवल्याचे समाधान देऊन गेला.
No comments:
Post a Comment