स्वप्न कोणाला...कधी ... कुठे...पडेल सांगता येत नाही. गाढ झोपेत किंवा बसल्या बसल्या डुलक्या घेताना अलगद त्याचे येणे असते. निरनिराळी स्वप्न आपल्या समोर येतात. काही स्वप्नं क्षणिक आनंद देणारी. तर काही भीती घालणारी. काही माणसाचं आयुष्य बदलणारी...
स्वप्न पाहण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. मग ती सत्यात अनुभवता आली नाही तरी हरकत नाही. ती पडतात – कधी लहान मोठी, भयानक, आश्चर्य कारक , उंच इमारतींची, सुटबुटाची, हिरो -सुपरस्टारची , प्रियकर -प्रियसीची किंवा उज्ज्वल भविष्याची. आकाशातल्या वेगवेगळ्या आकाराच्या ढगांप्रमाणे प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न.
आपल्याला पडलेले एखादं स्वप्न आपल्यासाठी किती महत्वाचे हे आपण ठरवत असतो. जगात असे अनेक जण आहेत, ज्यांना स्वप्नच पडत नाहीत. स्वप्न पडणं किंवा न पडणे यात वैज्ञानिक दृष्ट्या सायकॉलॉजीचा अभ्यास ही आहे.
मला कधी कधी वाटतं स्वप्न पडणं आणि त्या क्षणासाठी त्या काल्पनिक जगात रमणे. जे खऱ्या आयुष्यात कदाचित कधी पाहिले ही नसेल, जगले नसेल ते तात्पुरते जगणं यात वेगळीच मजा आहे. खूपदा आपण ऐकले असेल कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते असे भविष्याचे वेध घेणारे ही स्वप्न असतात. काही स्वप्न आपल्याकडून धाडस, संयम आणि कठोर मेहनत करून घेतात आणि सत्यात उतरत जातात. स्वप्न म्हणलं की ती कशीही असतात, त्याला कोणतीही सीमा नसते. बंधने नसतात. बहुतेक वेळा ती आपली अपूर्ण राहिलेली सुप्त इच्छा, ध्येय किंवा आपली भीती ही असू शकते. त्यामुळे स्वप्न हे आपल्या मनाचे फूट प्रिंट म्हणलं तर वावगं ठरणार नाही. शेवटी म्हणलंच आहे “ मनी वसे ते स्वप्नी दिसे “ जे लोक जागेपणी स्वप्न पाहतात त्यांची ती स्वप्न जीवनाचे ध्येय बनतात. जेव्हा ती स्वप्न त्याच्या जगण्याचे उद्दिष्ट बनत जाते तेव्हा हीच स्वप्न त्यांना झपाटून टाकतात. अशी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणारी व्यक्ती नक्कीच ते स्वप्न सत्यात जगते.
गाढ झोपेत पडलेलं स्वप्न आपल्याला वास्तवापासून कोसो दूर घेऊन जाते की तुटू नये असे वाटते आणि गाढ झोप अशीच आणखी काही क्षण चालू राहावी असे वाटायला लागते. काही वेळा याच गाढ झोपेतून काही स्वप्न खडबडून जागं करतात. हीच स्वप्नाची मजा आहे. वयानुसार, परिस्थितीनुसार , माणसागणिक स्वप्न बदलतात. शाळकरी मुलांची वेगळी. तरुणांची वेगळी. वरिष्ठांची वेगळी. पैशाची, लग्नाची, वस्तूची, गावाची, अज्ञात ठिकाणची, जंगलाची, प्राण्यांची, पक्षांची, हॉस्पिटलची, पोलिसचौकीची अजून थोडे लांब गेले तर परग्रहावरच्या न पाहिलेल्या एलियनची स्वप्न.
खरंच स्वप्नांना सीमा नसते पण धकाधकीच्या जगात स्वप्न पाहण्यासाठी ही पुरेसा वेळ नसतो. स्वप्नाची कवाडे खुली होण्याच्या वेळीच बरोबर घड्याळाचा नेमका गजर होतो आणि स्वप्नाच्या रंजक दुनियेतून आपली एक्सिट होते. त्यामुळे प्रत्येकानेच या विविध रंगी स्वप्नासाठी थोडा वेळ ठेवुन, त्यात रमून त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्यावा. त्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. स्वप्नांच्या गावी एकदा तरी जाऊन यावे.
2 comments:
Excellent
Thank you 😊
Post a Comment