Saturday, 20 February 2021

ऐकले का जरा ...!

     



आपले किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचे एखादे गुपित, एखादे सिक्रेट कानापर्यंत येण्याआधी खूप वेळा ऐकलेच असेल. “ भिंतीना ही कान असतात. “
या भिंतीच्या कानांनी किती तरी गोष्टी आपल्यात साठवून ठेवल्या असतील. ऐकल्या असतील. आपली स्वप्न, आपल्या अडचणी, लहानपणीच्या कान गोष्टी आणि आजचे व्यवहारिक, सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न हळूहळू यात येत गेले. कानात वारा जाऊ नये म्हणून त्यांना बांधून, झाकून घेणारे आपण आणि कापसाचे बोळे कानात टाकून प्रवास करणारे आपण या रोजच्या प्रवासात किती आणि काय काय वाऱ्यासोबत कानातून पुढे मनापर्यंत पाठवतो. म्हणून त्याच ऐकण्यावर आज लिहायला घेतले.
आपण ऐकतो. कधी गोष्टीची सुरुवात. कधी त्याचा अर्धा च भाग. तर कधी पूर्ण गोष्ट. कानांच्या पडद्यामागे आपले कधी कधी काल्पनिक विश्व पण आपणच रंगवत असतो. “ ध “ चा “ मा “ करता करता इतिहास ही लिहिला जातो. जस जसे वय वाढते या ऐकण्याच्या प्रक्रियेत आणखी आमूलाग्र बदल होत जातात. चुकीचे ऐकून कधी साखरे ऐवजी मीठ पडते. तर कधी दहा जणांची पंगत चार ताटांवर उरकावी लागते. कधी गुरूचा कान मंत्र तारतो तर कधी अफवांच्या लाटा बुडवत जातात. बरे – वाईट सगळेच कानांना ऐकावे लागते. ऐकून कधी न ऐकल्याचे अवसान घ्यावे लागते. म्हणून कधी सोन्या चांदीने ते ही हौसेने टोचले जातात. सजवले जातात. तो मान त्यांना मिळतो.
डोळ्यांनी भुरळ पाडण्याचे अनेक अनुभव आपण घेतले असतील पण कानांवर येणारे शब्द मग ते कधी आपले केलेले कौतुक असेल किंवा दिलेले उपदेश. गुड न्युज किंवा बॅड न्युज... यात वास्तविक येणाऱ्या आनंद आणि दुःखाच्या लहरी मनापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम कोण करत असेल तर ती ही आपली विरुद्ध दिशेला असलेली वळणा वळणाची दोन कांनाची जोडी.
निवांत बसल्या बसल्या वाजलेले एखादे जीवन गाणे मग ते “ जिंदगी की यही रीत है...” किंवा “ वाऱ्यावरती गंध पसरला... “ कानावर येताच संपत चाललेली आपली बॅटरी मिनिटातच चार्ज होते. आठवणीतले काही संवाद भूतकाळात फेरफटका मारून येतात. त्यात कधी विसावणारी संध्याकाळ असते तर कधी केशरी पहाट असते.
पाणीदार डोळे आणि नकटे नाक पुन्हा नाजूक हनुवटी किंवा गालावरचा तीळ वगैरे वगैरे सौंदयाचे टोल नाके असले तरी क्षणभरात बदलणारे आपले मन स्थिर ठेवण्यासाठी मला वाटत कानाचा ही तितकाच अविभाज्य भाग असतो म्हणून कदाचित सुपासारखे कान असणाऱ्या गजाननाची अर्चना केल्याशिवाय नव्याची सुरवात सहसा आपण करत नाही.
कधी हलके फुलके, गालातल्या गालात हसणे तर कधी लहान होऊन रडणे, कधी ओरडणे, गोड...मंजुळ... रटाळ किंवा रंजक बोलणे. एक ना अनेक सगळेच तर ऐकायचे काम असते. ते सोपे ही नसते. सांगणारे शब्द खूप असतात. त्याच आत्मीयतेने ऐकणारे कान हवे असतात. मग “ हम किसीसे कम नही “ म्हणतं त्यांना ही हवा असतो थोडा बदल. थोडी मनधरणी. थोडे श्रोते.
आपले शब्द आपण कानापर्यंत पोहोचवण्यात कुठे कमी पडत नाही ना ... घाई करत नाही ना... मनाची दारे उघडण्याआधी कानांचे पडदे उघडले आहे का. हे पहायला हवे. नसेल तर आपणच उघडून पहावे. कदाचित जी नवीन कथा त्यांना कानांना ऐकायची होती ती समोर असेल.

8 comments:

Omkar Bhoir said...

ऐकणे ही एक कला आहे.
छानच लिहीला आहे लेख.♥️🙌🏻

जुईली अतितकर said...

धन्यवाद ओमकार😊

Things and Thoughts said...

क्या बात है जुई,फारच छान

जुईली अतितकर said...

Thank you pranita tai ❣️

निखिल लिखित said...

छान गाता येत नाही म्हणून तानसेन होऊ शकत नाही पण तुझे सुंदर लिखाण वाचताना कानावर पडत होते म्हणून कानसेन नक्कीच झालो. खूप छान 👍

जुईली अतितकर said...

धन्यवाद निखिल सर

Daidipya Joshi said...

मस्तच 🎉🎉🎉

जुईली अतितकर said...

धन्यवाद 😊

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...