Friday, 9 June 2023

विसावा

“ You can not live one moment twice “ हे आपण खूपदा ऐकलं असेल. प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो हे देखील अनुभवले असेल. त्या प्रवासात याचाच शोध घेत मी निघाले होते. नवा दिवस नव्या अनुभवांना जन्माला घालतो. पण प्रवासात हा नवे पणा नक्की कुठे गवसतो याचा माग काढत मी पोहोचले होते, चारी बाजुंनी वेढलेल्या डोंगर माथ्यावर... 

एक विस्तीर्ण पठार, त्यात वळणा वळणाची वाट, चारी दिशांना मंदीरे, पौराणिक महाद्वार , फार गर्दी नाही, आपल्या सारखीच काही शोध घेत आलेली माणसे. आजूबाजूला होती ती फक्त झाडांची गर्दी, एका पाठोपाठ एक डोंगराची गर्दी, वर आकाशात ढगांची गर्दी आणि सुर्यास्ताचा सौम्य एकांत. 

तेव्हा मी प्रेमात पडले, तिथल्या निखळ शांततेच्या, अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या, आगीची दाहकता सोडून सौम्य झालेल्या त्याच्या किरणांच्या आणि बुडणाऱ्या सूर्याची प्रतिमा दाखवणाऱ्या नदी प्रवाहाच्या....मी प्रेमात पडले. अजून ही तिथेच आहे. त्या आठवणीत...

दूर नजर फिरवली तर दिसते उंच जाणाऱ्या डोंगर माथ्यावर एक एक दगडी टोक, जे तेव्हा पुढ्यात असलेल्या आव्हानांची जाणीव करून देत असते. तशीच काही आव्हाने आपण पार केलेली असतात आणि एका ठिकाणी आज स्थिर उभे असल्याचा स्थायी भाव तिथे जागा होतो. अस्ताला जाणारा सूर्य तेव्हा निराश करत नाही उलट आशावादी वाटतो. अशी संध्याकाळ आपल्याला शेवट किंवा अस्त ही सुंदर असू शकतो असं काही तरी सतत सांगत असते. दूरवर डोंगराच्या कुशीत तयार झालेले केशरी क्षितिज आणि त्याच क्षितिजाला समांतर असणारी वळणा वळणाची नदी न विसरणारे आठवणीतले एक पान होते. 

भवताली फुललेला लालसर गुलमोहर, दूरवर त्याचे झालेले आच्छादन तेव्हा इतके ही भडक वाटत नाही. पण हळूहळू त्याची लाली आपल्यात उतरत जाते. निरंतर वाहणारा वारा मागची सगळी आपण गिरवलेली पाने दूर वाहून घेऊन जातो. नसते त्याला कसले बंधन, नाही कुठली सीमा, तो वाहत असतो पण तेव्हा आपण मात्र तिकडेच थोडे थांबायचे असते.

कदाचित हा तोच वारा आहे जो जुन्या पानांना नवा करू पाहतोय... तेच हे वळण, इथे थोडं थांबायला हवं, सतत आपल्याला तो सांगत असतो. 

लहानपणी आपण निसर्ग चित्र काढायचो, त्रिकोणी डोंगर, चौकोनी घर, चार आकड्यात पक्षी आणि सरळ रेषेत निळी नदी. इथे तेच चित्र जिवंत होत जाते तेव्हा किती वेगळे असते. लोभसवाणे असते. पुढे समजते, त्रिकोणी डोंगर आपल्याला उंचावरून त्रिकोणी भासतच नाहीत. ते तर आणखी भव्य दिव्य वाटू लागतात. चौकोनी घरे तेव्हा फक्त ठिपके होतात आणि सरळ रेषेतली नदी खरतर सरळ नाहीच मुळी, फार वळणा वळणाची आहे. तिचे अंतरंग निळे नसून त्यात भवतालची प्रतिमा आहे. वाहणारा प्रवाह आहे. ते निळेपण आकाशतले नदीत उतरले आहे. चित्रातला जिवंतपणा त्या नदीत आहे. असे निसर्ग चित्र समोर दिसत असेल तर तेच हे वळण असावं जिथे जुन्याचे आपण नवे होऊ लागतो.
हो ना !

     


5 comments:

नसरीन अन्सारी said...

खुप छान जुई

Things and Thoughts said...

वा वा क्या बात है!!!
अगदी सुंदर वर्णन केलं आहे त्या निवांतपणाचा, एकांतपणाचा, आणि त्या शांततेचा.... तुझा फोटोही फार सुंदर आहे अगदी साजेसा. मस्त 👌👌👌👌

Daidipya Joshi said...

अप्रतिम वर्णन...

Dipak Gaikwad said...

भारी❣️

Abhay said...

छान लिहिलंयस, serenity is always preferred by calm mind. Rather it attract serenity by default.

Abhay

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...