पावसातली ती एक वाट आपल्या आठवणीत कायम ताजी असते. त्यावर प्रत्येक पावसात लिहिण्याचा मोह पुन्हा पुन्हा होत असतो. प्रत्येकाचा पाऊस वेगळा. प्रत्येकाची वाट वेगळी. अशा वेळी त्या वाटेवरचा आपला पाऊस कोणाला तरी सांगणे, ऐकणे, ऐकत त्यात भिजून जाणे किती भारी असू शकते ना !
पावसात छत्री घेऊन चालताना असे बरेचदा होते, बाजूने जाणारा पाण्याचा प्रवाह पायाला नकळत स्पर्श करून जातो. त्या पाण्यातुन चालणारी आपली पाऊले भिजतात. तिथेच क्षणभर थांबतात. क्षणिक आनंद घेतात. गार होतात. मागच्या कित्येक दिवसांची कोरड दूर होऊन जाते. वाहणारे पाणी चालताना आपल्या सोबत पुढे जाण्याची शर्यत करते. त्यातल्या इवल्या इवल्या लाटा आपल्याला सोबत घेऊन जातात. त्यांच्यात रमवतात. डागाळलेल्या रस्त्याला स्वच्छ करून जातात. पावसाचे पाणी टिपणारी छत्री थेंबासाठी किनारा होते. हळूच उतरून एखादा पावसाचा थेंब अलगद आपल्या गालावर येतो. हातावर येतो. ओंजळीत येतो. मोत्यासारख्या भासणाऱ्या त्या थेंबासाठी तेव्हा हाताची ओंजळ ही शिंपला होते. पावसाच्या सरी कधी आपल्या छत्रीतून हळूच डोकावतात. त्यांचे हे अडून अडून भिजवणे अल्लड प्रेमच असते.
पावसातली आपली वाट कधीच एकट्याची नसते. तो आपली सोबत करतो. तेव्हा आपल्यावर येणारे पावसाचे पाणी पुसण्याचे हट्ट आपण करू नये. ते क्षणभर तसेच राहू द्यावे. मनाच्या तळाशी असलेली तहान भागवण्याचे काम ते थेंब करत असतात. आपल्यात तो ओलावा येत जातो. हळूहळू तना मनात झिरपत जातो.
गडगडणाऱ्या ढगांच्या आड बरसणाऱ्या पावसात आपल्याला कशाची आठवण येत असेल तर तो आपला मागचा पावसाळा. तेव्हाची पावसाळी आठवण आज ही ओलावा देत असते. म्हणून पाऊस ही तितकाच जवळचा वाटतो. अशा वेळी कवी संदीप खरे यांच्या ओळी आठवतात, एखादी तरी पावसाळी आठवण असते, आपल्याला सांगत असते,
“ पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा,
कधी उधाणता अन केव्हा, थेंबाच्या संथ लयीचा,
नभ नको नको म्हणताना, पाऊस कशाने आला,
गात्रातून स्वच्छन्दी अन, अंतरात घुसमटलेला “
प्रत्येक पावसाची वेगळी आठवण, वेगळे चेहरे असतात. वेगळे नाते असते, पण पाऊस मात्र तसाच असतो. नव्या प्रवासात आपण कुठे तरी पुढे निघून आलेलो असतो. तेव्हा ही या नव्या प्रवासात न चुकता तो आपल्याला गाठतो. पुढच्या वाटेवर त्याची भेट होणे, डोकावणे, बिलगणे आणि झिरपणे आता हवे हवेसे वाटते. या प्रवासात तो सोबतीचा प्रवासी होतो आणि त्याचे असणे सुखावते. काल ही आणि आज ही...” पाऊस “ संपूर्ण वर्षभर ढगात दाटून राहिलेला जेव्हा बरसून येतो ना तेव्हा सुचवत असतो, “ दूरच्या प्रवासानंतर आपण ही बऱ्याच अंतराने का होईना आपल्या अंगणी परतून यावं. बरसून यावं ... पावसासारखं ... “
2 comments:
मस्तपाऊस
Post a Comment