Monday, 20 November 2023

योगायोग


“ योगायोग “ लहानपणापासून आज वर नकळत मिळालेले बरेचसे अनुभव आपण या शब्दाशी जोडत असतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या असंख्य लोकांसाठी, बऱ्या वाईट घटनांसाठी आपण कधी कधी निव्वळ एक निमित्त असतो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला ही उक्ती तर आपल्याला ही कधी तरी लागू पडली असेल. म्हणजे पहा ना... दरवर्षी बहरणारा आंब्याचा मोहोर एखाद्या वर्षी पावसामुळे गळून गेला की श्रावणातल्या रिमझिम सरींचा पाऊस तेव्हा आपल्यासाठी अवकाळी होतो.

एकदा व्यक्तिगत कामासाठी मी पोस्टात गेले होते. तिथे बाहेरच्या बाकावर बसले होते. मागे फुलांची लहान बाग केली होती. अर्धा तासांनी अनोळखी आजी आजोबा तिथे आले. आजोबांनी आजीना बाहेर बसायला सांगितले. त्या आजी माझ्या शेजारी येऊन बसल्या. माझा नंबर यायला बराच वेळ होता. बसून कंटाळा आला म्हणून मी त्या छोटेखानी बागेत फुलझाडांचे फोटो काढू लागले. मला फोटो काढताना पाहून त्या आजीबाईंनी त्यांच्या कडे असलेल्या निशिगंधाची फुले मला दाखवली. दोन चार दिली ही. नाव, गाव विचारले, वर वर चर्चा झाली. तेवढ्यात आजोबा बाहेर आले. दोघे स्कुटर वर बसून निघून ही गेले. निशिगंधाच्या त्या फुलांना आजीबाईंच्या ओंजळीत बघून मला तिथे दोन ओळी सुचल्या त्या लिहिण्याच्या घाईत ती फुले तिथेच राहिली. मी त्या ओळी मात्र घेऊन घरी आले.

“ निशिगंधाचे फुल अंतरी दरवळते आहे
प्रीतीची साखर मनामध्ये विरघळते आहे “

आणखी एक तिथलाच अनुभव, एक इसम आपल्या दोन लहान मुलांना घेऊन तिथे आला होता. मी काही तरी लिहिते पाहून माझ्याकडे आला. त्यांच्याकडे असणारा फॉर्म भरण्यासाठी त्यांना अडचण येत होती. मला तो फॉर्म दाखवला. त्यांची माहिती विचारून मी भरून दिला. नंतर येणाऱ्या दोन तीन जणांनी त्याच फॉर्म बद्दल मला विचारले. साहजिकच मी बसल्या बसल्या तिथे हे ही केले. तासाभऱ्याच्या प्रतिक्षेनंतर माझा नंबर आला. मी आत गेले. काम फत्ते झाले. फॉर्म फी भरताना माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. शोधत मी बाहेर आले. बाकावर पाहिले. माझ्या कडून फॉर्म भरून घेणारा तो इसम आपल्या दोन मुलांसोबत आपला नंबर येण्याची वाट पाहत बसला होता. मी सुटे विचारते ते त्यांनी दुरूनच हेरले आणि मला सुट्टे पैसे दिले आणि मी घरी परतले.


या घटनांमध्ये कधी मी कोणासाठी निमित्त झाले तर कधी माझ्यासाठी कोणी निमित्त झाले पण गोष्ट पुढे सरकली. त्या दिवशी ती बाग, निशिगंधाची फुले, आजीबाई, ती व्यक्ती, ती मुले आणि मी एकमेकांसाठी योगायोग म्हणून समोर आलो.

समर्थांनी यावर फार छान लिहिलेले आहे

“ मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥“

ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट ही आहे. जिथे सूर्योदय आहे, तिथे सूर्यास्त ही आहेच. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू ही आहे. असे असताना आपले हे निमित्त मात्र अस्तित्व आपण “ मी “ च्या छत्र छायेत वाढवत नेतो. जे माझ्या कडे आहे ते चिरंजीव मानतो. प्रत्यक्षात मात्र धन, संपत्ती आणि शरीर ही सोबत राहत नाही. झाडावरचे पान ही गळून पडते, पाणी ही स्थिर नसते, वाहून जाते. आठवणी ही कालांतराने विरून जातात. आज जे आहे ते उद्या नाहीसे होते. वरील अनुभवात माझे अस्तित्व हे तेव्हा फक्त माझे नसून ते त्या ठिकाणी भेटलेल्या प्रत्येकाशी कळत नकळत जोडलेले होते. जे पुढच्या काही तासांनंतर माझ्या आजूबाजूला नव्हते ही. योगायोगाने मिळालेले अमूल्य क्षण जपताना जे मागे उरते ना ते चिरंतन... चिरंजीव...


1 comment:

Makarand Bapat said...

सुंदर... Live into the present moment म्हणतात ते हे असंच... तू त्या वेळी, त्या ठिकाणी फक्त वास्तवात जगत होतीस..अगदी साधं, सरळ, simple .. खूप छान... लिहीत राहा...
आदेश... अलख निरंजन...

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...